द्राक्ष, कांद्यासह इतर पिकांच्या उत्पादनाबाबत संशोधनात्मक पद्धती वापराव्यात. त्याची साठवणूक करण्यासाठी योजनेचा लाभ घेत आधुनिक पद्धतीचा वापर करीत नाशिक जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात बुधवारी (दि. ३) कृषी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लवटे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, अशोक दामले, संदीप मेढे उपस्थित होते.
प्रसाद म्हणाले की, ई-पीक पाहणी, पीक कापणी प्रयोगासाठी तहसीलदारांसह अन्य यंत्रणांची मदत घ्यावी. ई-पीक पाहणीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून आराखडा सादर करावा. कृषी विभागाची दरमहा पहिल्या बुधवारी आढावा बैठक घेण्यात येईल.
कांदाचाळ अनुदानाचा वापर करा...
जिल्ह्यात विविध फळ पिकांच्या लागवडीबरोबरच कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कांदा चाळीसाठी जिल्हा वार्षिक योजनेत निधी उपलब्ध आहे. या निधीतून कांदा चाळ कार्यान्वित करता येतील. त्यासाठी महिला बचत गटांचा सहभाग आवश्यक आहे तसेच पाणी वापर संस्थांचा सक्रिय सहभाग नोंदवून घेतल्यास कृषी विकास होण्यास मदत होईल.
बैठकीतील सूचना...
• आगामी काळात जिल्ह्यातील कृषी कार्यालयांना भेट दिली जाणार.
• कृषी विभागाने कार्यालय स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची दक्षता घ्यावी.
• जिल्ह्यात स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.
• हवामान केंद्रांसाठी जागेबाबत तहसीलदारांशी समन्वय ठेवावा.
• प्रधानमंत्री किसान सन्मान आणि पीक विमा योजनेतील रकमेतून कर्ज वजावट होणार नाही, याची काळजी घ्यावी.
• कार्यालयीन कामकाजासोबत कृषी विभागाने नवोन्मेषी उपक्रम राबवावेत.
• तूर, मूग, उडीद यांसह कडधान्य उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावेत.
• जिल्हा वार्षिक योजनेत मिळणारा निधी वेळेत खर्च होईल, असे नियोजन करावे.
