गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यानेही चालू गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ३५०० रुपये देण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 'जबाब दो' आंदोलनास यश मिळाले.
हरळी येथे कार्यस्थळावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसह मागील एफआरपी फरकासह चालू हंगामातील प्रतिटन ३६०० रुपये दरासाठी ठिय्या मांडला होता.
दरम्यान, चर्चेअंती कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांनी टनाला ३५०० रुपये देण्याचे लेख आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, कार्यकारी संचालक सुनील महिंद, मुख्य लेखापाल बापू रेडेकर आदी उपस्थित होते.
आंदोलनात राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, तानाजीराव देसाई, दीपक पाटील, सखाराम केसरकर, जगन्नाथ हुलजी, अॅड. सयाजीराव पाटील, आप्पासाहेब जाधव सहभागी झाले होते.
लेखी हमी मिळाली
◼️ चर्चेदरम्यान, संचालक मंडळाने जिल्हा बँकेशी चर्चा करण्यासाठी ४ दिवसांची मुदत मागितली.
◼️ परंतु, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर कार्यकर्ते ठाम राहिले.
◼️ त्यामुळे चर्चेच्या दोन फेऱ्यांनंतर लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
◼️ दरम्यान चालू हंगामात प्रतिटन ३४०० रुपये एकरकमी उचल आणि दिवाळीपूर्वी १०० रुपये अदा करण्याचे आश्वासन लेखी स्वरुपात देण्यात आले.
भूमिकेवर ठाम, मागणी मान्य
◼️ एफआरपी ३०७४ रुपये बसत असतानाही कारखान्याने ३४०० रुपये दर जाहीर केला असून ३२६ रुपये जादा देत आहोत, असे संचालकांचे म्हणणे होते.
◼️ आपल्या उसाचा साखर उतारा चांगला असल्याने चांगला दर देणे शक्य आहे, यावर गड्यान्नावर ठाम राहिले, त्यामुळे मागणी मान्य करावी लागली. 'ओलम'नंतर गडहिंग्लज कारखान्यानेही ३५०० रुपये दर जाहीर केला.
अधिक वाचा: श्री दत्त साखर कारखान्याचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; विनाकपात कसा दिला दर?
