पोर्ले तर्फ ठाणे: आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखान्याने यंदाच्या तुटलेल्या उसाला एकरकमी विनाकपात ३६३४ रुपये देणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर 'स्वाभिमानी'ने कोतोली फाटा येथे केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
कारखान्यातील एका ठेकेदाराने चर्चेदरम्यान कार्यकर्त्यांना चुकीची भाषा वापरल्याने संघटनेचे कार्यकर्ते अंगावर धावून गेल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दालमिया प्रशासनाने आठवड्यापूर्वी एफआरपीची ३५२५ रुपये पहिली उचल जाहीर केली होती. एफआरपीत मोडतोड केल्याने, एफआरपीची एकरकमी जाहीर करावी, यासाठी शेतकरी संघटनांनी कारखान्यावर मोर्चा काढून लेखी आश्वासनाची मागणी केली होती.
संघटनांनी दिलेल्या मुदतीमध्ये निर्णय न झाल्याने शुक्रवारी (दि. ७) दिवसभरात संघटनेचे कार्यकर्ते आणि दालमिया प्रशासनाच्या दोन बैठका फिस्कटल्या. त्यामुळे आक्रमक झालेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी पाचनंतर कोतोली फाटा येथे ठिय्या आंदोलन केले.
पाच तास चाललेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान लेखी आश्वासनावरून चर्चा लांबत राहिल्या. अखेर दालमिया प्रशासनाने यंदाच्या तुटलेल्या उसाची एफआरपी ३६३४ रुपये देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
यावेळी युनिट हेड संतोष कुंभार, जनरल मॅनेजर (केन) श्रीधर गोसावी, एचआर प्रमुख सुहास गुडाळे, शिवप्रसाद देसाई, किशोर लेंगरे, पृथ्वीराज सरनोबत उपस्थित होते.
तसेच पन्हाळा पोलिस सहायक निरीक्षक आण्णासो बाबर, संघटनेचे स्वस्तिक पाटील, भामगोंडा पाटील, विक्रम पाटील, रामराव चेचर, संभाजी जमदाडे, दगड्डू गुरवळ, बाबूराव शेवडे उपस्थित होते.
अधिक वाचा: चालू गळीत हंगामात 'ह्या' साखर कारखान्याने उसाला दिला राज्यात सर्वाधिक दर
