सोलापूर : सरलेल्या हंगामात तोडणी केलेल्या उसाचे एफआरपीप्रमाणे ३७२ कोटी ६१ लाख २८ हजार थकविल्याने राज्यातील कारखान्यांवर आरआरसी कारवाई केली आहे.
यात सोलापूरसहधाराशिव, अहिल्यानगर, सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांवर साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी आरआरसी कारवाई केली आहे.
मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसीलदार कारवाई करणार का?, यावर शेतकऱ्यांचे पैसे मिळणे अवलंबून आहे. राज्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात यंदा १५ नोव्हेंबर नंतर साखर कारखाने सुरू झाले.
अपुरे ऊस क्षेत्र तसेच ऊस तोडणी यंत्रणाही कमी असल्याने बरेचसे साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालले नाहीत. दरवर्षीच ऊस घालून पैशासाठी अनेक महिने चकरा माराव्या लागत असल्या तरी शेतकऱ्यांनी याही वर्षी त्याच साखर कारखान्यांना ऊस पुरवठा केला आहे.
आरआरसी केलेल्या काही साखर कारखान्यांचा पट्टा दोन व काही कारखान्यांचा पट्टा पडून तीन महिने झाले आहेत. मात्र ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत.
साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी जरी आरआरसी कारवाईचे आदेश काढले असले तरी त्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना आदेश कधी मिळणार? व तहसीलदार कारखान्यांची साखर विक्री करून शेतकऱ्यांचे पैसे कधी देणार?, याकडे लक्ष लागले आहे.
कारवाईला झाला उशीर
१५ मार्चच्या साखर कारखान्यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ४९९ कोटी १४ लाख रुपये रुपये पेंडिंग आहेत. ऊस तोडणी केल्यानंतर १४ दिवसात साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी ऊस उत्पादकांचे पैसे साखर कारखानदार देण्यास तयार नाहीत. आरआरसी कारवाई फारच विलंबाने होताना दिसत आहे.
कारखाना आणि थकबाकी (लाखात)
मातोश्री लक्ष्मी, अक्कलकोट - ५८७
गोकुळ शुगर धोत्री, सोलापूर - २,८३१
लोकमंगल अॅग्रो, बीबीदारफळ - १,७६१
लोकमंगल शुगर, भंडारकवठे - ५,००९
जय हिंद शुगर, आचेगाव - ४,८२९
श्रीसंत दामाजी, मंगळवेढा - ३,५८१
सिद्धनाथ शुगर, तिर्हे - ३,९०६
इंद्रेश्वर शुगर, बार्शी - २,२३५
धाराशिव शुगर, सांगोला - ५७३
भीमाशंकर शुगर, धाराशिव - ६९२
स्वामी समर्थ शुगर, नेवासा - १,१५९
श्री गजानन महाराज, संगमनेर - १०४
खंडाळा तालुका, सातारा - २,६८१
किसनवीर, सातारा - ५,७४४
सचिन घायाळ, छ. संभाजीनगर - १,५७६
एकूण - ३७२ कोटी ६२ लाख
मी येण्याअगोदर ९५ साखर कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी नोटीस बजावली होती. मी ३५ साखर कारखान्यांची सुनावणी घेऊन सर्वाधिक थकबाकी असलेल्या १५ साखर कारखान्यांची आरआरर्स कारवाई केली आहे. सुनावणी अगोदर व सुनावणीनंतर शेतकऱ्यांचे पैसे दिलेले कारखाने वगळून कारवाई करावी लागते. आणखीन काही कारखान्यांचा आरआरसी आदेश काढण्यात येईल. - सिद्धाराम सालीमठ, साखर आयुक्त, पुणे
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर