करमाळा : फड सांभाळ तुऱ्याला गं आला.. तुझ्या उसाला लागल कोल्हा.. या अस्सल मराठमोळ्या लावणीची प्रचीती करमाळा तालुक्यातील उसाच्या फडावर नजर टाकली की उसाला तुरे आल्याने आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
साखर कारखाने २६५ जातीचा ऊस गाळपाला लवकर घेईनात, त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
हमखास उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड यंदा केली. मात्र, आता ऊस वेळेवर कारखान्याला जात नसल्याने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
जास्त उतारा देणाऱ्या उसाचे त्वरीत गाळप
तालुक्यातील व शेजारील कारखाने जास्त साखर उतारा देणाऱ्या ८६०३२, गोल्डन १०००५, सुधारित ८६०३२, २३४ या उसाची तोड करीत आहेत. त्यामुळे २६५ जातीचा ऊस शेतात मोठ्या प्रमाणावर उभा आहे. या जातीच्या उसाला तुरा येण्याचे प्रमाण मोठे आहे.
एवढ्या वर्षी आमचा ऊस घेऊन जा..
ऊस आतून पोकळ होऊन वजन घटण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एवढ्या वर्षी तरी आमचा हा ऊस घेऊन जा... पुढल्या वर्षी आम्ही दुसऱ्या जातीच्या उसाची लागवड करू, अशी विनवणी शेतकरी करीत आहेत
शेतामध्ये दीड ते दोन महिन्यांच्या पुढे तुरा आलेला ऊस राहिला तर त्याला मोठ्या प्रमाणावर फुटवे फुटतात. ऊस पोकळ पडण्यास सुरुवात होते. त्यातील साखरेचे विघटन होते. त्यामुळे तुरा आलेल्या उसाची लवकर तोडणी करावी. सततच्या पावसामुळे उसाला युरियाचे हप्ते वेळेवर देता न आल्याने उसाला तुरा येतो. यामुळे उसाला नत्राची मात्रा व्यवस्थित दिली आणि जुलै, ऑगस्टमध्ये शेतात पाणी साचू दिले नाही की तुरा येण्याचे प्रमाण कमी होते. - देवराव चव्हाण-पाटील, कृषी अधिकारी, करमाळा
उसाची लागवड ऑगस्ट २०२२ मध्ये केलेल्या उसाच्या लागवडीला आता १६ महिने पूर्ण झाले आहेत. आता ऊस पूर्णपणे परिपक्व झाला आहे. उसाला मोठ्या प्रमाणावर तुरे आल्याने वजन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्यामुळे कारखान्याने उसाची तोडणी लवकर करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे. - अण्णासाहेब सुपनवर जिल्हा सरचिटणीस, भाजप किसान मोर्चा
