कुईवाडी : माढा तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या एकूण ७६ हजार शेतकऱ्यांपैकी आजपर्यंत तब्बल ७३ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तहसील विभागाकडून १०१ कोटी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान देणे सुरू आहे, यातील मयत, सामायिक खातेदार, केवायसी दुरुस्ती या विविध कारणांमुळे फक्त ८५६ शेतकरी या लाभापासून वंचित राहत असल्याचे तहसीलदार संजय भोसले यांनी सांगितले.
माढा तालुक्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सुमारे ८१ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस, कांदा, मका यासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले होते.
अशा बाधित झालेल्या ७३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर १०१ कोटी रुपयांचे अनुदान रक्कम जमा करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, केवायसी नसल्याने, मयत असल्याने, सामाईक क्षेत्र असल्याने अशा काही कारणांमुळे ८५६ शेतकरी वंचित राहिले आहेत.
शेतकरी कोणत्याही पद्धतीने केवायसी पूर्ण करू शकतात, त्यासाठी तालुका कृषी कार्यालय किंवा तलाठी, कृषी सहायक यांच्याकडून मदत केली जात आहे, यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डची जोडणे आवश्यक आहे.
याद्या ग्रामस्तरावर लावल्या
◼️ अनुदान मिळालेल्यांच्या ग्रामस्तरावर याद्या केंद्र शासनाने या योजनेतील पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी आधार संलग्न केवायसी सक्तीचे केले आहे.
◼️ ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. त्याच्या याद्या ग्रामस्तरावर लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी अद्याप पूर्ण झाली नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही.
◼️ अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी ८ हजार ५००, बागायती शेतीसाठी हेक्टरी १७ हजार इतकी मदत देण्यात आली आहे.
◼️ तसेच फळबागांसाठी प्रति हेक्टर २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आले आहे, तर बी बियाणांसाठी असलेल्या १० हजारांचे अधिकचे अनुदानदेखील देण्यात आले आहे.
अतिवृष्टी व पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात माढा अव्वल आहे. आजपर्यंत १०१ कोटी रुपयांचे अनुदान ७३ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्याचबरोबर १० हजार रुपयांच्या बी-बियाणांच्या अनुदानापोटी देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत ६१ कोटी जमा केले आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त ८५६ लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान मात्र खात्यावर गेले नाही. त्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. तालुक्याचे अनुदान वितरणाचे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. - संजय भोसले, तहसीलदार, माढा
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 'या' १७ साखर कारखान्यांनी दिला तीन हजारांपेक्षा अधिक दर
