राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) हे खाद्यतेलांच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी तयार केले गेले आहे.
अभियानांतर्गत पिकाची उत्पादकता वाढ व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी उन्हाळी हंगाम २०२५ करिता भुईमूग पिकासाठी हेक्टरी १५० किलो (रक्कम रु. ११४/किलो) शेंगा व तिळासाठी हेक्टरी २.५ किलो (रक्कम रु. १९७/किलो) प्रमाणित बियाणे १००% अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे.
भुईमूग पिकाचे १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे याचा लाभ नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर व अकोला या ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावयाचा आहे.
तसेच तिळ पिकाचे १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे याचा लाभ जळगाव, बीड, लातूर व बुलढाणा या ४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावयाचा आहे. यासाठी प्रति लाभार्थी किमान ०.२० हेक्टर व कमाल १ हेक्टर मर्यादित लाभ देय आहे.
शासकीय बियाणे पुरवठादार संस्थांचा भुईमुगासाठी २० किलो किंवा ३० किलो तसेच तिळासाठी ५०० ग्रॅम किंवा १ किलो याप्रमाणे पॅकिंग साईज आहे.
शेतकऱ्यांना बियाण्याच्या पॅकिंग साईज नुसार प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येईल. त्यामुळे क्षेत्रानुसार आवश्यक बियाण्यापेक्षा पॅकिंग साईज नुसार अधिकचे बियाणे परीगणित होत असल्यास याकरिताची रक्कम शेतकऱ्यांनी स्वहिश्याने भरावी लागेल.
भुईमूग व तीळ पिकाच्या बियाण्याचा लाभ घेण्यासाठी MahaDBT या संकेतस्थळावर प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्याक्षिके, फ्लेक्झि घटक औषधे आणि खते या टाईल अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
१००% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड लक्षांकाच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्त्वावर करण्यात येणार आहे.
त्यामुळे या घटकासाठी जास्तीत जास्त इच्छुक शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत आणि लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग त्याच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेत मोठा बदल; आता शेत रस्त्यांच्या कामांना येणार वेग
