रत्नागिरी : आंबा हंगाम संपल्यावर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे क्रमप्राप्त असताना हंगाम संपून पाच महिने लोटले तरी परतावा जाहीर करण्यात न आल्याने बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा होती.
अखेर दिवाळीच्या एक दिवस आधी विमा कंपनीकडून थेट बागायतदारांच्या खात्यातच पैसे जमा करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यासाठी आंबा, काजू पिकाकरिता १०० कोटी ६१ लाख १४ हजार ५९३ रुपये रक्कम परताव्याकरिता वितरित करण्यात आली आहे.
गतवर्षीच्या हंगामात उत्पादन अत्यल्प असताना दि. २० मे पासून कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. बागायतदारांच्या मागणीमुळे कृषी विभागाकडून विमा कंपनीकडे सतत पाठपुरावा सुरू होता.
अखेर कंपनीने परताव्याची रक्कम जाहीर न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केली आहे. फळपीक विम्याचे काजू पिकासाठी ७ कोटी ४२ लाख ३४ हजार ३८१. ३३ रुपये तर आंब्यासाठी ९३,१८,८०,२११.३३ रुपये मिळाले आहेत.
जिल्ह्यासाठी १०० कोटींचा परतावा
◼️ रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ३६,४६५ शेतकऱ्यांनी १८०१९.५०३४५ हेक्टर क्षेत्राचा फळपीक विमा काढला होता.
◼️ २८८ कोटी १५ लाख १५ हजार ६५३ रुपये विमा संरक्षित रक्कम होती.
◼️ त्यामध्ये आंबा पीक उत्पादन घेणारे ३०,१३२, तर काजू उत्पादन घेणाऱ्या ६,३३३ शेतकऱ्यांचा समावेश होता.
रत्नागिरीला काजू परतावाच नाही
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना काजूचा परतावा देण्यात आला आहे. मात्र, रत्नागिरी तालुक्याला काजू पिकाचा परतावाच आलेला नाही. त्यामुळे काजू उत्पादक बागायतदार अजूनही परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अधिक वाचा: अतिवृष्टी मदतीच्या तिसऱ्या आदेशात 'या' जिल्ह्याला ९५ कोटी; शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे?
