गाय म्हैस वेळेत पान्हा का घालत नाहीत. आपल्या गोठ्यातील म्हैस, गायदूध देताना अनेक वेळा पान्हा घालत नाहीत. खूप वेळ धारा काढण्यासाठी बसावे लागते. असा अनुभव अनेक पशुपालकांनी घेतला असणार.
असे प्रकार व्याल्यानंतर किंवा दूध देताना अधून मधून अनुभवले जातात. त्यामुळे अपेक्षित दूध उत्पादन मिळत नाही. त्यामुळे पशुपालक वैतागताना दिसतात. खरंतर हे आपल्याला टाळता येऊ शकते.
दूध देण्याची प्रक्रिया समजून घेऊया
दूध देणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. दूध देण्यासाठी ज्यावेळी वासरू किंवा रेडकू कासेला सोडतात किंवा आपण कासेवर पाणी मारून कास स्वच्छ करतो. कोरडी करून हलक्या हाताने मालिश करतो. त्यावेळी होणाऱ्या शारीरिक उत्तेजना या मेंदूच्या खाली असणाऱ्या पिट्युटरी ग्रंथीकडे पाठवल्या जातात. त्यामुळे त्या ग्रंथी मधून ऑक्सिटोशीन हे संप्रेरक स्त्रवले जाते. ते रक्ताद्वारे कासेकडे येते व पान्हा घातला जातो. या ठिकाणी शारीरिक उत्तेजना व संप्रेरक दोन्हीही काम करत असल्यामुळे त्याला ‘न्यूरो हार्मोनल रिफ्लेक्स’ असे म्हणतात.
दूध देण्यासाठी लागलेल्या सवयी
गायी-म्हैशी या सवयीच्या गुलाम असतात. त्यामुळे दूध काढण्याच्या भांड्यांचा आवाज, नियमित धार काढणाऱ्या माणसांचे आवाज व दर्शन, धार काढताना विशिष्ट पेंड पशुखाद्य देण्याची सवय असेल आणि दुधाच्या वेळा आपण निश्चित केल्या असतील तर अशा वेळेस शरीरामध्ये ऑक्सिटोसीन हे संप्रेरक स्त्रावले जाते व जनावर पान्हा घालून चांगलेच दूध उत्पादन मिळते.
पान्हा चोरू नये म्हणून काय कराल?
- अनेक वेळा या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला की जनावर पान्हा घालत नाही. किंवा घालता घालता पान्हा चोरतात व दूध उत्पादन घटते.
- गाई म्हशी या वातावरणातील बदलाबाबत खूप संवेदनशील असतात.
- दूध काढताना गोठ्यातील वातावरण हे शांत हवे. आवाज व गोंगाट असता कामा नये. त्यामुळे जनावरावर ताण येतो.
- एड्रिनॅलिन सारखे संप्रेरक स्त्रवते. त्यामुळे ऑक्सिटोशीनचा परिणाम कमी होतो. पान्हा सोडताना अडचणी येऊ शकतात.
- दूध काढताना कमीत कमी वेळेत कास मोकळी करावी.
- सात ते आठ मिनिटांमध्ये पूर्ण धार काढली गेली पाहिजे.
- धारेला बसण्यापूर्वी गाई म्हशीला प्रेमाने सामोरे जावे.
- त्यांना मारणे, घाबरवणे हे टाळले पाहिजे.
- सोबत दूध काढण्याची पद्धत सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पूर्ण हाताने धारा काढाव्यात.
- काही वेळा सौम्य गर्भाशयदाह, रक्तक्षय, नकारात्मक ऊर्जा संतुलन, कॅल्शियम व फॉस्फरस या क्षारांची शरीरातील कमतरता यासह दूध काढण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन जर खराब असेल तरीसुद्धा जनावरे पान्हा घालत नाहीत.
- वासरू, रेडकू जर जन्मल्यानंतर काही कारणाने मयत झाले तरीदेखील जनावरे पान्हा घालत नाहीत. पहिलारू कालवड व रेडीला तसा हा पहिल्यांदा दूध देण्याचा अनुभव नवीन असतो. त्यामुळे हळूवार सवय लावावी.
उपाय म्हणून नेमक्या कारणाचा शोध घेऊन नजीकच्या तज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आपले उत्पादन घटणार नाही याकडे लक्ष द्यावे.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: तुमचे जनावर चालताना मागील पाय झटकत चालतं? असू शकतो हा आजार; कसे कराल उपाय? वाचा सविस्तर