pochat kosh सद्य परिस्थितीत पारंपरिक पिकापेक्षा तुती रेशीम उद्योग हा आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असून मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात याचे क्षेत्र वाढताना दिसून येत आहे.
परंतू काही रेशीम उद्योजकांना नॉन स्पिनिंग या समस्यांना सामोरे जाव लागत आहे. रेशीम कीटकांची शेवटची पाचवी प्रौढ अळी अवस्था परिपक्व झाल्यास कोष न विणता चंद्रिकेवर फिरताना दिसत आहे.
पोचट कोष विणणे व कोष न विणणे याची कारणे
◼️ शिफारशीपेक्षा शेणखत व गांडूळ खत याचा वापर कमी अल्प प्रमाणात असणे तसेच तुती बागेत ग्रीन मॅन्यूअरिंग पिके अंतर लागवड नसणे.
◼️ तुती बागे भोवती असलेले पारंपरिक पिके सोयाबीन, कापूस यावर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करताना हवेच्या माध्यमातून आलेले कीटकनाशकाचे अंश तुती पाल्यावर पडतात.
◼️ परिपक्व रेशीम अळ्या कोष विणत असताना रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान १५ अंश से. पेक्षा कमी व ३५ अंश से. पेक्षा जास्त असणे.
◼️ तुती बागेत वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा जसे की कीटकनाशके, तणनाशके यांचा रेशीम कीटकांसोबत संपर्क झाल्यास कीटकांच्या मज्जा संस्थेवर परिणाम होणे.
◼️ जैविक बुरशीनाशक जसे कि बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझीयम रिलाई यांचा संपर्क झाल्यास व उशिरा प्रौढ रेशीम कीटकाला रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पोचट कोष विणतात किंवा कोष विणत नाहीत.
◼️ रेशीम कीटक संगोपन गृहात फॉर्मालिन, कार्बन डायऑक्सइड व अमोनिया चे प्रमाण जास्त असणे.
◼️ पारंपरिक पिकांकडून रेशीम उद्योगाकडे वळलेले अगोदर शेतात मिरची ही पिके असणे.
◼️ प्रमाणापेक्षा जास्त व अयोग्य वेळी सेरिमोर व संपूर्णा चा वापर करणे.
◼️ रसायनयुक्त हिरवी शेडनेट वापरणे तसेच प्रौढ रेशीम कीटक (३ री, ४ थी, ५ वी अळी अवस्थेला) तुतीचा कोवळा पाला खाऊ घालणे.
◼️ तुती बागेत शिफारस नसलेले डीएपी, युरिया किंवा शिफारस असलेले गरजेपेक्षा किंवा शिफारसीपेक्षा जास्त रासायनिक खताची मात्रा देणे.
◼️ हिवाळ्यात थंडीमध्ये कोळसा जाळून तापमान वाढविताना धूर होणे तसेच कार्बन डायऑक्सइड प्रमाण वाढते.
◼️ रेशीम कीटक संगोपन गृहात हवा खेळती न राहिल्यास ऑक्सिजन पुरवठा कमी होतो त्यामुळे रेशीम ग्रंथीची वाढ होत नाही.
नॉन स्पिनिंगचे व्यवस्थापन
◼️ तुती बागेत दरवर्षी ८ टन प्रति एकर कुजलेले शेणखत दोन समान हप्त्यात म्हणजे जून व नोव्हेंबर मध्ये ४ टन विभागून द्यावे. दुसऱ्या वर्षी गांडूळ खत २ टन प्रति एकर द्यावे.
◼️ शिफारस असलेले रासायनिक खत रेडी रेकनर अमोनिअम सल्फेट १४० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट ७० किलो व म्युरेट ऑफ पोटॅश १९ किलो प्रत्येक वेळी तुती छाटणी नंतर द्यावे सोबतच शेणखत देणे गरजेचे आहे.
◼️ जून महिन्यात पट्टा पध्दत लागवड केलेल्या तुती बागेत अंतर पीक म्हणून बोरू किंवा ढेंचा एकरी २० किलो बियाणे पेरावे. दीड महिन्यानंतर फुलोरा येण्या अगोदर पीक नांगराच्या साह्याने बागेत गाडून टाकावे. अशा प्रकारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास रासायनिक खते व कीटकनाशके अंश जमिनीत राहत नाही.
◼️ तुती बागेभोवती गवत वर्गीय चारा पिके घ्यावे जेणे करून आजूबाजूला असलेले पारंपरिक पिकावर केलेली कीटकनाशक फवारणी अंश तुती पाल्यावर येणार नाही.
◼️ कोष विणनाऱ्या कीटकांसाठी वापरणाऱ्या प्लास्टिक चंद्रिका पूर्णपणे निर्जंतुकीकरण केलेल्या वापरावे.
◼️ चंद्रिकेची साठवण सुरक्षित ठिकाणी करावी जेणेकरून चंद्रिकेशी कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा व धुराशी संपर्क येऊ नये.
◼️ संगोपन गृहातील तापमान कोष विणन काळात २४ ते २६ अंश से. व आद्रता ६० ते ७० टक्के असावी तसेच हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.
◼️ रेशीम कीटकांची हाताळणी व्यवस्थीत करावी.
◼️ सेरी संपूर्णाचा योग्य वेळी व प्रमाणात वापरः रेशीम कीटक एक समान परिपक्वतेसाठी व एकाच वेळी कोष तयार होण्यासाठी ५० अंडी पुंजसाठी १० मिली प्रति २ लिटर पाण्यात मिश्रण तयार करून १० टक्के अळ्या परिपक्व झाल्यानंतर पातळ तुती खाद्यावर एकसारखी फवारणी करून पाने खाऊ घालावीत.
◼️ सेरी मोर हे वनस्पतीजन्य अर्क असून ५ मिली (एक अँपुल) प्रति २.५ लिटर पाण्यात मिश्रण करून रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर २ दिवसांनी फवारणी करावी.
◼️ फवारणी करताना बेडवर एकही पान शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणीनंतर अर्धा तासानी तुती पाला खाद्य द्यावे.
◼️ रेशीम कीटक संगोपन गृहात थर्मोकम हुमीडीफायर या यंत्राचा वापर करून तापमान व आद्रता नियंत्रित ठेवता येते.
◼️ रेशीम कीटक संगोपन गृहातील तापमान व आद्रता पाहण्यासाठी थर्मोहायग्रो मीटर लावावे.
अशा पद्धतीने व्यवस्थापन केल्यास नॉन स्पिनींग समस्या न येता शाश्वत कोष उत्पादन घेता येईल.
- डॉ. चंद्रकांत लटपटे
प्रभारी अधिकारी
रेशीम संशोधन योजना, वनामकृवि, परभणी
अधिक वाचा: संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल