कोल्हापूर : 'गोकुळ'दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दर फरकाशिवाय आणखी एक दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ करण्याची घोषणा आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.
संघाने यापूर्वी दिवाळीनिमित्त म्हैस दूध उत्पादकांना प्रति लिटर २.४५ रुपये व गाय दुधापोटी १.४५ रुपये दूध दर फरक म्हणून दिलेला आहे.
मात्र, या रकमेतून डिबेंचर कपात केल्याच्या तक्रारी दूध संस्थांच्या आहेत. गेले १५ ते २० दिवस यावरून दूध संस्थांच्या पातळीवर वातावरण ढवळून निघाले आहे.
यावरून गुरुवारी मोर्चाही काढण्यात आला. आज, वसुबारसनिमित्त दूध उत्पादकांना काहीतरी देऊ, अशी ग्वाही ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी दिली. संस्थांनी डिबेंचरची रक्कम परत मागितली आहे, पण ताळेबंदाला तरतूद केल्याने ती देता येत नाही.
दूध खरेदी दरात वाढ करून देण्याचा निर्णय संचालकांनी घेतल्याचे समजते. त्यानुसार म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा विक्रम, तब्बल ३२ लाख लाभार्थ्यांची निवड; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा