सांगली जिल्ह्याच्या गव्हाण (ता. तासगाव) येथे बैलगाडी शर्यतीच्या वेळी हजारो लोक शर्यतीचा आनंद घेत असताना दुसरीकडे मुक्या जीवांचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सध्या गावोगावी बैलगाड्यांच्या बेलगाम शर्यतीचा धुरळा उडत असताना काही ठिकाणी नियम पायदळी तुडविले जात आहेत. केवळ बैलांवरच नव्हे तर, एकप्रकारे अटी-शर्तीवर चाबकांचे फटकारे मारले जात आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा चाबूक ओढण्याची गरज आहे.
गव्हाण येथे बैलगाडी शर्यतीच्या वेळी नियम बासनात गुंडाळून ठेवल्याचे चित्र दिसून आले. शर्यतीचे अंतर वाढवले गेले. अंतर कमी असते तर कदाचित तलावापर्यंत बैलगाडी गेली नसती. दुर्घटनेत चालक वाचला आणि बैलांच्या गळ्याला फास लागल्यामुळे ते तडफडून बुडून मेले. बैलगाडी शर्यतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडला.
गव्हाण येथील दुर्घटनेच्या निमित्ताने शर्यतीत होणाऱ्या बैलांच्या छळाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पहाटेच्या सुमारास बैलगाडी शर्यत घेण्याचे प्रकार घडतात. बैलगाडी शर्यतीचा सराव करताना पहाटेच्या सुमारास माळरानावर अनेकजण सराव करतात.
सराव करताना बैलांना शॉक देणे, शेपटी पिरगाळणे, खिळे टोचणे, चाबकाचे फटके मारणे असे विकृत प्रकार घडतात. शर्यतीवेळी गैरप्रकार घडल्यास ५० हजार अनामत रक्कम जप्त करण्याची तरतूद आहे. परंतु, अशी कारवाई केल्याचे ऐकण्यात येत नाही.
फक्त 'या' साठीच शर्यतीची परवानगी
महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशाच प्रसंगी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास परवानगी आहे. राजकीय कार्यक्रम आणि नेत्यांचे वाढदिवस आदी प्रसंगी बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास परवानगी देता येत नाही. परंतु, हा नियम सर्रास पायदळी तुडवला जातो.
परवानगी देण्यापूर्वी शर्यतीच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करावी. बैलांचा अपघात होणार नाही, गर्दीमध्ये घुसणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. मार्ग विना अडथळा असेल याची दक्षता घेतली पाहिजे. - अजित पाटील, प्राणिमित्र, सांगली.
परवानगी मिळाली तर नियम पाळा
बऱ्याच संघर्षानंतर बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शर्यतीचा थरार लुटताना परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अटी व शर्तीचे पालन केल्यास प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई होणार नाही.
शर्यतीची घ्या मजा, बैलांना नको सजा
गेल्या काही वर्षात बैलगाड्यांच्या शर्यतीची मजा घेण्यासाठी अनेक शौकीन उपस्थिती दर्शवतात. लाखो रूपयांची बक्षिसे लावली जातात. परंतु, रेसची मजा घेताना बैलांना कोणतीही सजा मिळणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संयोजक आणि प्रशासनावर असते. ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे. शर्यतीनंतर बैलांना इजा झाली नसल्याची खात्री करावी.