सोलापूर : जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे.
वाहतूक करताना लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक केले आहे. याशिवाय लम्पीवर नियंत्रण आणि निर्मूलन करण्यासाठी सोलापूर जिल्हा लम्पी त्वचारोगासाठी 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाची बाधा झालेल्या जनावरांची संख्या एक हजाराच्या घरात गेली आहे. त्यामध्ये सध्या सुमारे तीनशे जनावरांवर उपचार सुरू आहेत.
लम्पीचा वाढता वेग लक्षात घेता जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हा हा लम्पी त्वचारोगासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
मागील साथींचा अनुभव लक्षात घेऊन सध्या जरी जनावरांच्या बाजारांना सशर्त परवानगी देण्यात आलेली असली तरी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्देश दिले जाणार आहेत.
जनावर सध्या ज्या ठिकाणी पाळले आहे, त्याठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी २८ दिवसांपूर्वी लम्पीसाठी प्रतिबंधात्मक म्हणून देण्यात येणारे शेळीच्या देवीचे (गोट पॉक्स) लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याशिवाय बाधित जनावराच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा इतर साहित्य तसेच बाधित जनावराचे शव नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पशुपालकांनी ही घ्यावी दक्षता
◼️ लम्पी चर्मरोगसदृश लक्षणे आढळल्यास ताबडतोब नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
◼️ बाधित जनावरांना सामान्य जनावरांपासून वेगळे ठेवा.
◼️ गोठा वारंवार निर्जंतुक करा.
◼️ संध्याकाळी कडुलिंबाचा पाला जाळून धूर करा.
◼️ डास, माश्या जास्त येणार नाहीत याची काळजी घ्या.
◼️ लसीकरण केले नसल्यास लसीकरण करून घ्यावे.
जनावरांच्या गोठ्यामध्ये माशा व डास होणार नाहीत, याची काळजी घ्या, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.
अधिक वाचा: Farmer Success Story : खारे बंधूंची किमया, दीड एकरातून घेतले २० लाखांच्या केळीचे उत्पादन