राज्यात उष्णतेचा पारा वाढला असून तापमान ४० डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. उष्मा वाढल्याने नागरिकांना त्रास होतोच, त्याचबरोबर जनावरांनाही झळ बसत आहे.
दूध उत्पादनालाही फटका बसला असून उष्यापासून बचाव करण्यासाठी पशुपालक जनावरांच्या पाठीवर ओला कपडा, भिजवलेले गोणपाट टाकतात, काही ठिकाणी दिवसातून तीन-चार वेळा पाण्याने भिजवले जाते.
यंदा उष्मा कमालीचा वाढला आहे, दुपारी घराबाहेर पडताना मुश्कील होते. जसा माणसांना त्रास होतो, त्यापेक्षा अधिक जनावरांना होतो.
जनावरे बंदिस्त असल्याने गरम हवेने त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. उष्यामुळे दूध उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होतो.
पशुपालकांनी ही काळजी घ्यावी.- जनावरांना थेट सूर्यप्रकाश टाळण्यासाठी सावलीची व्यवस्था करा.- जनावरांना दिवसातून किमान तीन वेळा पाणी द्या. त्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्या.- गोठ्यात खेळती हवा असावी. छतावर गवत टाकून पाणी शिंपडल्यास गोठा थंड राहतो. - शेडमध्ये थंड हवेची व्यवस्था करा. पंखे किंवा कुलरचा वापर करता येऊ शकतो.
ओल्या गोणपाटाचा गारवाजनावरांचे अंग दिवसभर थंड रहावे, यासाठी आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील सदाशिव चौगले हे पशुपालक म्हशीच्या पाठीवर ओले गोणपाट टाकतात. दिवसभर ते ओले राहण्यासाठी अधूनमधून पाणी मारतात. त्यामुळे जनावरांना गारवा मिळतो.
दिवसातून चार वेळा पाण्याने अंघोळसाधारणतः पशुपालक आपली जनावरे सकाळी धुतात; पण उन्हाळा सुरू झाला की दोनवेळा त्यांच्या अंगावर पाणी मारतो. आता उष्मा वाढल्याने कुडित्रे (ता. करवीर) येथील अजित पाटील हे गायींचे शरीर थंड राहण्यासाठी दिवसभरामध्ये सतत पाण्याने भिजवतात. म्हाळुंगे (ता. पन्हाळा) येथील शुभांगी सागर पाटील हे आपल्या म्हशीला दिवसातून चार वेळा पाण्याने धुऊन काढतात.
अधिक वाचा: उन्हाळ्यात टंचाईच्या काळात कमी जागेत, कमी वेळेत कसा तयार कराल पोषक चारा? वाचा सविस्तर