सोलापूर : मोठ्या आर्थिक अडचणीत असलेला राज्याचा शिखर संघ वाचविण्यासाठी जबाबदारी स्वीकारलेल्या एनडीडीबीकडे (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ सोपविण्याची मागणी होत असताना केवळ एनडीडीबीचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय सोलापूर दूध संघाने घेतला आहे.
एनडीडीबीच्या महाराष्ट्र विभागीय अधिकारी स्वाती श्रीवास्तव या सोलापूर जिल्हा दूध संघाला आता मार्गदर्शक संचालक म्हणून काम पाहणार आहेत. अगोदरच सोलापूर दूध संघ आर्थिक अडचणीत असल्यानेच प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले होते.
प्रशासकीय मंडळाची मुदत पूर्ण होत असतानाच संचालक मंडळ निवडणूक घेण्यात आली. येत्या ८ मार्च २०२५ रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीला तीन वर्षे पूर्ण होतात. तीन वर्षांत दूध संघ आणखीच आर्थिक गर्तेत सापडला असल्याचे दिसत आहे.
अतिशय काटकसरीने पारदर्शक कारभार व एनडीडीबीसारख्या संस्थेकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. मात्र, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाकडून दूध संघ वाचविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.
एक-एक करीत सर्व उत्पादने बंद झाली आहेत. सध्या पॅकिंग पिशवी विक्री इतकेही दूध संकलन होत नसल्याचे दिसत आहे. राज्याचा शिखर दूध संघ महानंदही आर्थिक गर्तेत असल्याने एनडीडीबीकडे वर्ग केला आहे.
एनडीडीबीने महानंदच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देत स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू ठेवले आहे. सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघानेही महानंदप्रमाणे निर्णय घ्यायला हवा. मात्र, जिल्हा संघाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वाती श्रीवास्तव यांना ठराव करून घेतले आहे.
दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, व्हाईस चेअरमन दीपक माळी, कार्यकारी संचालक सुजित पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही. मात्र, संचालक दीपक वाडदेकर यांनी सोलापूर जिल्हा दूध संघ एनडीडीबीला जोडण्याची आमचीही मागणी असून चेअरमन साहेबांशी बोलून सांगतो असे सांगितले.
समस्या घेणार जाणून
याबाबत एनडीडीबीच्या महाराष्ट्र विभागीय अधिकारी स्वाती श्रीवास्तव यांना विचारले असता सोलापूर संघाची अद्याप माहिती घेतली नाही. त्यांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेतले जाईल, असे सांगितले. संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक ठोस भूमिका आर्थिक तोटा व कर्जाचा बोजा वरचेवर वाढत असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाला कोण वाचविणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक वाचा: Sugarcane FRP 2024-25 : सांगली जिल्ह्यात हुतात्मा कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर