दादासाहेब येडे
मागील काही दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोरडगाव, कोळसांगवी, येळी, जिरेवाडी शिवारातील जनावरांच्या खुरकत व लम्पी आजाराने थैमान घातले आहे. अनेक जनावरे शेतकऱ्यांच्या दावणीलाच जीव सोडत असताना, येळी व कोरडगाव येथील पशुसंवर्धन अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. येळी येथील अधिकाऱ्यांकडे प्रभारी चार्ज असून, ते या परिसरात येतच नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
अतिवृष्टी आणि आता जनावरांच्या आजारांमुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारखान्याचे हंगाम सुरू झाल्याने ऊस तोडणी मजूर आले असून, त्यांच्या सोबतच्या जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी शासनाने प्रभावी यंत्रणेचा वापर करून मनुष्यबळ वाढवून कोरडगाव केंद्रातील सात व येळी केंद्रातील १५ गावांमध्ये, तसेच ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांच्या बैलांचे तातडीने लसीकरण करणे गरजेचे आहे.
कोरडगाव परिसरात अतिवृष्टीमुळे मागील काही दिवसांत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात आता लम्पी व खुरकत रोगाने थैमान घातले आहे. आधी पिकेही आणि आता जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. अशात कोरडगाव येथील पशुसवंर्धन अधिकारी हे वास्तव्यास बाहेर असल्याने, ते या भागात येतच नाहीत. शिवाय, त्यांच्याकडेच येळी येथील पदभार असून, दोन्ही ठिकाणी ते सतत गैरहजर असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या कारखान्याच्या हंगामासाठी ऊस तोड मजूर मोठ्या प्रमाणात आले असून, मजुरांच्या जनावरांना रोगाची लागण होऊन एकदा बैल गेला, तर दुसरा उभा कसा करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांवर औषधोपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागत असल्याने या भागातील शेतकरी हतबल झाला आहे.
प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गाडे यांनी सांगितले. जनावरांना रोगांपासून संरक्षण मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीने लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच युवराज फुंदे, रणजित गाडे, सुरेश फुंदे, सुदाम गाडे, काकासाहेब घुले, गोकुळ घुले, विश्वनाथ गाडे आदींची नावे आहेत.
खुरकत आजाराची वैशिष्ट्ये
खुरकताची लागण झाली की जनावरे शांत राहतात. नियमित चारापाणी घेत नाहीत. दुधाचे प्रमाण कमी होते. जनावरांच्या तोंडाच्या आतील भागाला, तसेच जिभेवर फोड येतात. तोंडातून लाळ गळते. पायांच्या मध्यभागी फोड येतात. कधी अपंगत्वही येण्याची शक्यता असते.
कोरडगाव व येळी येथील पशुवैद्यकीय केंद्रामध्ये लस उपलब्ध असून, जादा मनुष्यबळ उपलब्ध करून लसीकरणास सुरुवात करण्यात येईल. तसेच ऊस तोडणीसाठी आलेल्या जनावरांचेही प्रत्यक्ष हजर राहून लसीकरण करू. - डॉ. जगदीश पालवे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, पाथर्डी जि. अहिल्यानगर.
दूध उत्पादनावर परिणाम
कोळसांगवी येथे गेल्या वर्षभरापासून जनावरांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे खुरकत आजाराची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली असून, त्यात जनावरे बळी पडत आहेत. जनावरांच्या खुरांना आजाराची लागण झाल्याने दूध देणारी तसेच शेतात काम करणारी जनावरेही त्रस्त आहेत. त्याचा परिणाम दूध उत्पादन व शेतीकामावर होत आहे.
