पावसाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकरी नवीन बैलजोडी किंवा एखादा बैल खरेदी करतात. पेरणीच्या तोंडावर जनावरांच्या बाजारात सर्जा-राजा चांगलेच भाव खाताना दिसत आहेत.
अनेक शेतकरीशेती हंगामासाठी बैलजोडीचा वापर करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बैलजोडी खरेदी करताना अनुभवी व्यक्तीची मध्यस्थी करून बैलजोडी खरेदी-विक्रीचा व्यवहार करावा लागत आहे.
समाधानकारक पावसाने खरिपाच्या तोंडावर जनावरांचा बाजार पुन्हा उसळल्याचे चित्र आहे. बाजारात जाऊन शेतकरी जनावरांची खरेदी करतात, तर खुल्या पद्धतीनेही गावागावांत जनावरांची खरेदी-विक्री होते.
देशी गाय मिळेनाशी झाली आहे. तालुक्यात बैलगाडा शर्यतीचे वेड मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी बैलांची खरेदी केली जाते.
शर्यतीसाठी मिळणाऱ्या बैलांची किंमत ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत असते. शर्यतीसाठी अनेक जण खर्च करतानाही दिसून येतात.
आंतरमशागतीसाठी बैलजोडीला नाही पर्याय
◼️ शेत मशागतीसाठी यांत्रिकीचा वापर वाढला असला, तरी आंतरमशागतीसाठी बैलजोडीशिवाय पर्याय नाही.
◼️ पावसाळ्यात अनेक शिवारांतील शेत मशागतीसाठी बैलजोडीचाच आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागतो.
◼️ सद्यःस्थितीत लाखांपर्यंत रक्कम सर्जा-राजासाठी मोजावी लागत आहे.
ट्रॅक्टरने मशागतीचे दर वाढले
◼️ वाढत्या महागाईची सर्वच क्षेत्रांना झळ सोसावी लागत आहे. अशातच मजुरी, डिझेल वाहनाच्या साहित्याचे दर वाढल्याने खर्च वाढत आहे. त्यामुळे मशागतीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
◼️ लहान शेतकऱ्यांसाठी अडचण, मोठ्या शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर फायदेशीर ठरत असल्याचे बोलले जात आहे.
◼️ शेतामध्ये मशागत करूनही पीक हाती लागेल की नाही याची सतत चिंता बळीराजाला सतावत असल्याचे ग्रामीण भागात पाहावयास मिळते.
शारीरिक क्षमता व बांध्यानुसार जनावराची किंमत
- आंतरमशागत करण्यासाठी शेतकऱ्यांकडून चांगल्या बैलजोडीचा शोध घेत खरेदी करण्यावर भर दिला जात आहे.
- यात शारीरिक क्षमता अधिक असणाऱ्या आणि गोंडस दिसणाऱ्या बैलजोडीला अधिक पसंती देत आहेत.
चाळीस हजारांपासून लाखांपर्यंत बैलजोडी
जनावर - किंमत
गावरान बैलजोडी - ४० ते ९० हजार
हायब्रीड बैलजोडी - ५० ते ८० हजार
खिलार बैलजोडी - ९० ते ९५ हजार
दुभती गाय - ३५ ते ५० हजार
दुभती म्हैस - ६० ते ८० हजार
बैलजोडी महाग झाली असून, चाराही भाव खात आहे. तरीही आम्ही दरवर्षी दोन बैल सांभाळून त्यांच्यावर शेती करत आहोत. काहीवेळा ट्रॅक्टरचीही मदत घेतो असे शेतकरी सांगत आहे.
अधिक वाचा: जनावरांना पण होतं आम्ल विषार पित्त; कशी दिसतात लक्षणे? काय कराल उपाय?