कुर्डूवाडी : निमगाव (ता. माढा) येथील प्रदीपकुमार भागवत पाटील यांच्या फार्मवर तयार झालेली एबीएस आरमाडा जातीची उच्च प्रतीची पाडी (कालवड) गुजरातच्या एका शेतकऱ्याला विक्री केली गेली.
या विक्रीत या पाडीने विक्रम केला असून, तिला उच्चांकी दर २ लाख ५५ हजार रुपये किंमत मिळाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून या कालवडीबद्दल एकच चर्चा सुरू आहे.
या पाडीस योग्य संगोपन आणि पोषण देऊन फुल साईजमध्ये तयार केले असून, ती दररोज ३५ लिटर दुधाचे उत्पादन देते. यामुळे उत्कृष्ट आरोग्य व उत्पादन क्षमतेने या पाडीने शेतकी क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
प्रदीप पाटील यांचा २५ गायींचा गोठा आहे. ते म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रशासनाधिकारी म्हणूनही काम करीत आहेत.
नोकरी सांभाळून वडिलोपार्जित असलेला शेती व्यवसायदेखील ते सांभाळत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी गोठा बांधला आहे. यात अनेक जातींच्या गायींचा समावेश आहे.
सदरची कालवड ही गुजरातच्या शेतकऱ्याला येथील व्यापारी संजय सालगुडे यांच्यामार्फत त्यांनी विकली आहे. सध्या तालुक्यात या कालवडीबाबत चर्चा सुरू आहे.
