'गोकुळ'चेमुंबईतीलदूध पॅकिंग वेळेत न झाल्याने वितरकांकडे वेळेत पोहचले नाही. त्यामुळे दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरीत झाले नसल्याने संघाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
३५ वर्षे काम केलेल्या सुरत येथील कंपनीचा ठेका काढून एन. आर. इंजिनिअरींग प्रा. लि. दिल्ली या कंपनीला देण्याचा अट्टाहास कोणाचा होता? असा सवाल दूध उत्पादक शेतकरी करत आहेत.
मुंबईतील दुधाचे वितरण वेळेत व्हावे, यासाठी काहीच दिवसांपूर्वी तेथील पॅकिंग क्षमता प्रतिदिनी ८ लाखांहून बारा लाख लिटर केली आहे. सध्या येथे रोज साडेआठ लाख लिटर पॅकिंग होऊन त्याचे वितरण केले जाते.
गेली ३५ वर्षे हे काम गुजरात येथील सुरतची कंपनी व्यवस्थित करत होते; पण, ३१ मार्चला त्यांच्या ठेक्याची मुदत संपल्यानंतर त्यांना बदलण्याचा निर्णय संचालकांनी घेतला.
त्यांच्या ठिकाणी एन. आर. इंजिनिअरींग प्रा. लि. दिल्ली या कंपनीला यांना मंगळवार (दि.१) पासून दिला; पण, पहिल्या दिवसापासूनच त्यांना पॅकिंगचे काम नीट करता येईना.
दोन दिवसात दीड लाखाहून अधिक लिटर दूध वितरकांपर्यंत वेळेत पोहचले नसल्याने दूध परत घेण्याची नामुष्की संघावर आली आहे. त्याचबरोबर पॅकिंगही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यातून दूध बाहेर येत असल्याच्या तक्रारीही वितरकांच्या वाढल्या आहेत.
नेत्यांकडून संचालकांची कानउघाडणी
मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसापासून वितरण व्यवस्थित होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पूर्वीचा ठेका बंद करून कोणाच्या सांगण्यावरून नवीन व्यक्तीला ठेका दिला, अशी विचारणा करत नेत्यांनी संचालकांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.
दोन दिवस मुंबईतील दूध वितरण काहीसे विस्कळीत झाले होते, मात्र शुक्रवारपासून सुरळीत झाले आहे. - डॉ. योगेश गोडबोले, (कार्यकारी संचालक, 'गोकुळ).
हेही वाचा : शेणखत वापरण्यापूर्वी यंदा करा 'ही' प्रक्रिया; उत्पादन वाढून मातीची राहील अबाधित सुपीकता