कोल्हापूर : परराज्यातून जातिवंत म्हैस खरेदीसाठी 'गोकुळ', 'वारणा' दूध संघ ४० ते ५० हजार रुपये अनुदान देते.
या म्हैशी खरेदीसाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतल्यास तिसऱ्या वर्षांनंतर शेवटच्या हप्त्यात दहा हजार रुपये सवलत देणार असल्याची घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली.
शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी ३० लाखांपर्यत कर्ज ८ टक्के दराने देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेची ८७वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी महासैनिक दरबार सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, संस्थांना बळकटी देण्यासाठी स्वर्गीय पी. एन. पाटील पीक प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत १०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना पीक कर्ज खात्यावर १ टक्के व्याज रिबेट देण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष राजू आवळे यांनी आभार मानले.
'एआय' बाबत कागलला राज्यात 'नंबर वन' करू
शेतकऱ्यांसाठी 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज असून, कागल तालुक्यातील सर्व कारखान्यांच्या माध्यमातून त्याची सुरुवात केली आहे. 'एआय' तंत्रज्ञान वापरणारा 'कागल' हा राज्यातील पहिला तालुका करू, असा विश्वास अध्यक्ष मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
लाडका सचिव योजना
विकास संस्थांच्या सचिवांना आर्थिक वर्षात दोन कोटी बक्षीस पगारापोटी तरतूद केलेली आहे. संस्था संगणकीकरणामध्ये जे सचिव संस्थेचा सलग डायनामिक डे एंड करतील अशा सचिवांना प्रोत्साहन म्हणून १० हजार देणार आहे. त्याचबरोबर जे सचिव बँकेच्या क्यूआर कोडचे उद्दिष्ट पूर्ण करतील त्यांना तालुकानिहाय २० हजार, १५ हजार व १० हजार अनुक्रमे बक्षीस देणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतरच नोकरभरती
बँकेच्या शाखांत कर्मचारी कमी असल्याने ग्राहकांना त्रास होतो. यासाठी नोकरभरती करा, अशी मागणी यशवंत बँकेचे उपाध्यक्ष दिलीप खाडे यांनी केली. यावर, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भरती करणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.
सरसकट कर्जमाफीचा ठराव
यंदा जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत अतिवृष्टीमुळे ऊस पिकांची वाढ झालेली नाही. शेतकरी आर्थिक अरिष्टात असल्याने कर्जमाफीची मागणी विलास पाटील (गगनबावडा) यांनी केली. यावर, अध्यक्ष मुश्रीफ यांनी सरसकट कर्जमाफीचा ठराव मांडला, त्यास आमदार सतेज पाटील यांनी अनुमोदन दिले.
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविणाऱ्या राज्यातील 'या' २८ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई