आता राज्यात चारा टंचाई जाणवू लागली आहे. कडब्याचे दर गगनाला भिडत आहेत. प्रशासन सर्व मार्गाने चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न करत असते. पूर्वी आपण चारा छावण्याचा अनुभव देखील घेतला आहे.
सध्या विविध शासकीय योजनांमधून वाटप केलेल्या बी बियाणाच्या माध्यमातून मका, कडवळ, नेपियर गवत उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आडसाली, पूर्व हंगामी, सुरू, खोडवा या उसापासून देखील वैरण उपलब्ध होईल.
सोबत तूर, मूग, उडीद, सोयाबीन या द्वारे देखील आपल्याला काही प्रमाणामध्ये वैरण उपलब्ध होऊ शकते. पण त्याचा वापर व साठवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे हे तितकेच खरे आहे. त्यामुळे संभाव्य चारा टंचाईच्या परिस्थितीवर मात करता येईल.
चारा देण्याच्या पद्धती आणि चारा बचत
◼️ आपण जर उपलब्ध चारा नियमितपणे कुट्टी करून वापरला तर ४१ ते ४३ टक्के वैरणीची बचत होते.
◼️ अनेक वेळा कडब्याची पेंडी न सोडता दावणीत तशीच टाकून दिल्यामुळे जवळजवळ ४२% वैरण वाया जाते.
◼️ तीच जर सोडून नुसती टाकली तर ६ टक्के बचत होते.
◼️ हाताने गुडघ्यावर दोन तुकडे केले तर १६ टक्के वैरणीमध्ये बचत होते.
◼️ ही जर टक्केवारी पाहिली तर जास्तीत जास्त बारीक तुकडे करून घातल्यास सर्व पशुपालकांच्या फायद्याचे ठरेल.
◼️ कुर्हाड, वैरण कापायचा अडकित्ता यावर जर वितभर लांबीचे तुकडे केले तरीसुद्धा २२ ते २५ टक्के वैरणीची बचत होते.
◼️ समजा जर आपण चार जनावरे सांभाळत असू तर आणखी एक जास्तीचे जनावर आपल्याला आहे त्या वैरणीमध्ये सहज सांभाळता येईल हे विशेष.
कडबाकुट्टी आणि चारा बचत
◼️ ज्यावेळी आपण ज्यादा जनावरे सांभाळतो त्यावेळी कडबाकुट्टी यंत्राचा वापर करणे अत्यावश्यक ठरते.
◼️ यापूर्वी कृषी व पशुसंवर्धन विभाग मार्फत अनेक योजनांद्वारे कडबाकुट्टी पुरवठा करण्यात आला आहे.
◼️ अनेक पशुपालकांनी याचा लाभ घेऊन वापर देखील करत आहेत.
◼️ कडबाकुट्टी यंत्राचा वापर करून ४१ ते ४३% वैरणीची बचत होत असल्याने कडबाकुट्टी मशीन चा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला हवा.
कडबाकुट्टी आणि व्यवसाय संधी
दूध संस्था, ग्रामपंचायत, सहकारी सोसायट्या या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत यांनी स्वतंत्र युनिट बसवल्यास लहान पशुपालकांना देखील त्याचा फायदा होऊ शकेल. जिल्ह्यातील महिला बचत गट देखील याबाबतीत पुढाकार घेऊ शकतात.
कडब्याची कुट्टी कशी करावी?
कडब्याची कुट्टी करत असताना पूर्णपणे एकदम बारीक न करता दोन ते अडीच इंचापर्यंत त्याचे तुकडे करावेत. त्यामुळे रवंत चांगले होऊन त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात.
कडब्याची कुट्टी मशीन वापरताना घ्यावायची काळजी
कडबा कुट्टी मशीन चा वापर करताना देखील काळजी घ्यावी. मशीन मध्ये हात अडकणे, अंगावर सैल कपडे असतील तर ते गिअर व बेल्ट मध्ये अडकणे असे अपघात घडू शकतात. त्यासाठी पायरो इलेक्ट्रिक सेंसर लावलेले मशीन आपण वापरू शकतो. या मशीन बाबत आपल्याला सविस्तर माहिती भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वेबसाईटवर मिळू शकते.
अशा पद्धतीने आपण जर वैरण बचत केली तर त्यातून निर्माण होणाऱ्या वैरणीतून आपली वैरण टंचाई निश्चितपणे सुसह्य होऊ शकेल.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: म्हशीमधील उरमोडी, मृदूअस्थी आजार कशामुळे होतो व त्यावर काय करावे उपाय?