अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत गोशाळा व गोवंश संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्था व पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना जाहीर केली आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठी विहित नमुन्यातील प्रस्ताव १० डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत सन २०२५-२६ या वर्षापासून दरवर्षी ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यात शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण आणि कल्याण करणाऱ्या संस्था व व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. पहिल्या पुरस्कारासाठी आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांमधून एका गोशाळेची निवड केली जाईल.
व दुसरा पुरस्कार शासकीय/खाजगी गोवंश संवर्धन संस्था, गोवंश प्रक्षेत्रे, कृषी विद्यापीठे, पशुवैद्यक विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी पशुपालक समूह गट किंवा वैयक्तिक गोपालक यांच्यातून एकाची निवड केली जाईल.
निवड झालेल्या संस्थांना प्रजासत्ताक दिनी गौरविण्यात येणार आहे. यात पुरस्कार निवडीचे काही निकष आहेत ते खालीलप्रमाणे आहेत.
पुरस्कार निवडीचे निकष
◼️ पुरस्कार निवडीसाठी संस्थेचे किंवा व्यक्तीचे मागील पाच वर्षांतील कार्य पाहिले जाईल.
◼️ यामध्ये आत्मनिर्भर गोशाळा, शुद्ध गोवंश पैदास, प्राकृतिक शेतीचा प्रसार, गो-उत्पादनांची निर्मिती, आणि बायोगॅस/सौरऊर्जा वापर यांसारख्या विविध निकषांवर गुणांकन केले जाईल.
अधिक वाचा: Dairy Farm Kolhapur : 'यूपी'मधला भय्या राबतोय गोठ्यात.. म्हणूनच आमचा दूध व्यवसाय थाटात
