कोल्हापूर : 'गोकुळ'ने म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून केली जाणार आहे.
त्याचबरोबर पशुखाद्य पोत्याच्या दरात ५० रुपये कमी केले असून दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चात प्रतिलिटर १० पैशाची वाढ केल्याची घोषणा संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी शुक्रवारी केली.
वसुबारसनिमित्त 'गोकुळ'च्या चीज, गुलाबजामून व गाभण जनावरांसाठी महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन पशुखाद्य उत्पादनांचा प्रारंभ वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, Gokul Milk 'गोकुळ'ची उपपदार्थ दर्जेदार असून त्याची मागणी वाढत आहे. आगामी काळात त्यासाठीही दूध राखीव ठेवावे लागणार आहे.
म्हैस दूध संकलनवाढीसाठी नियोजनबद्ध काम करा, कोणत्याही परिस्थितीत आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुण्यतिथीला २० लाख लिटर दूध संकलनाचा कलश पूजन करण्याचा निर्धार यानिमित्ताने करूया.
आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी स्वागत केले. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक केले.
आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर उपस्थित होते. संचालक अभिजित तायशेटे यांनी आभार मानले.
असा वाढणार दुधाचा दर प्रतिलिटर.
म्हैस/गाय | फॅट | एस. एन. एफ | जुना दर | नवीन दर
म्हैस | ६.० | ९.० | ५१.५० | ५२.५०
गाय | ३.५ | ८.५ | ३३.०० | ३४.००
पशुखाद्याच्या दरात अशी झाली कपात
पशुखाद्य (५० किलो बॅग)
महालक्ष्मी गोल्ड १२५० वरून १२००
कोहिनूर डायमंड १६५० वरून १६००
'एसी'मध्ये नव्हे गायींच्या साक्षीने दरवाढ
संचालक मंडळ इतर निर्णय एसीमध्ये बसून निर्णय घेत असले, तरी आज म्हैस व गाय दूध खरेदी दरवाढीचा निर्णय गायी, म्हशींच्या साक्षीने घेतल्याचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सांगितले.
असा पडणार 'गोकुळ'वर वर्षाला ताण
दूध दर फरकापोटी अतिरिक्त रक्कम - ७० कोटी.
पशुखाद्य दर कपात - ११ कोटी.
संस्था व्यवस्थापन खर्चात १० पैशांची वाढ - ६ कोटी.
अधिक वाचा: सप्टेंबर महिन्यातील पिक नुकसानभरपाईचा जीआर आला; राज्यातील 'या' सात जिल्ह्यांच्या मदतीला मंजुरी