कोल्हापूर : आगामी श्रावण महिना, सणासुदीचा कालावधी पाहता म्हैस दुधाची मागणी वाढणार आहे. त्या दृष्टीने दूधसंकलन वाढीसाठी प्रयत्न करा अशी सूचना नेत्यांनी 'गोकुळ'दूध संघाच्या संचालकांना केली.
'गोकुळ,' शेतकरी संघाच्या कामकाजाचा रविवारी जिल्हा बँकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी आढावा घेतला.
'गोकुळ'ची ठेव व गुंतवणूक ५१२ कोटीपर्यंत पोहोचली असून, यंदा संघाला ११ कोटी ९७ लाखांचा नफा झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना रिबेटमध्ये प्रतिलिटर २० पैसे जादा देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार यंदा दिवाळीला म्हैस दूध उत्पादकांना प्रतिलिटर २.४५ रुपये, गाय दूध उत्पादकांना १.४५ रुपये मिळणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले.
यावेळी अध्यक्ष नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे आदी संचालक उपस्थित होते.
अधिक वाचा: गाय व म्हैस व्याल्यानंतर वार कशामुळे अडकते? कसे कराल उपाय? वाचा सविस्तर