पथ्रोट, (अमरावती) : पूजेच्या ताटात ठेवलेली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी नैवेद्यासोबत नजरचुकीने गाईला खाऊ घालण्यात आल्याची घटना भाऊबीजेच्या दिवशी मुहादेवी येथे घडली. ही चूक लक्षात आल्यावर घरातील अख्खे कुटुंब चिंतेत होते.
परंतु, पथ्रोट येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. रोशन वेरुळकर यांनी मेटल डिटेक्टरद्वारे शोध घेऊन गाईवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर ती सोन्याची अंगठी बाहेर काढून कुटुंबाच्या हवाली करण्यात आल्याची अफलातून घटना पथ्रोट, (अमरावती) येथे घडली.
मुऱ्हादेवी येथील रहिवासी असलेले पोलिस पाटील तुळशीराम पखान यांच्या मुलीने भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणीकरिता पूजेच्या साहित्यासोबत ताटात सोन्याची पाच ग्राम वजन असलेली अंगठी ठेवली होती.
कार्यक्रमानंतर पूजेच्या ताटात ठेवलेले इतर साहित्य व नैवेद्य गाईला भरवितांना नेमके त्याच वेळी नजरचुकीने साहित्या सोबत ताटात ठेवलेली अंगठी सुद्धा गाईने गिळली.
पखान यांनी स्थानिक डॉक्टरांकडून त्या गाईवर उपचार केले व शेणावाटे अंगठी बाहेर येण्याची वाट पाहिली. सतत चार दिवस हा नित्यक्रम सुरू राहिला.
परंतु, त्यामध्ये यश आले नाही. मग स्थानिक डॉक्टरांनी पथ्रोट येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. रोशन वेरुळकर यांच्याकडून पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर डॉ. वेरुळकर यांनी आपले सहकारी डॉ. आदेश चोपडे (पविअ, धनेगांव) यांना सोबत घेऊन मुऱ्हा येथे जाऊन सदर गाईची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करून पोटात धातू असल्याची खात्री करून घेतली. ही धातूमय वस्तू शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात येते असे पशुपालकास सांगितले.
त्यानंतर दीड तासाच्या शस्त्रक्रियेनंतर गायीच्या पोटातून सोन्याची अंगठी तसेच पाच नाणे व बशीचा तुकडासुद्धा यशस्वीरीत्या बाहेर काढून अंगठी पशुपालकाच्या स्वाधीन केली. शस्त्रक्रियेनंतर गाईने लगेच पूर्ववत खाणे-पिणे सुरू केले असून, गाय आता स्वस्थ आहे.
अधिक वाचा: बोरवडेच्या साठे बंधूंनी भात मळणीसाठी केले देशी जुगाड; एक तासात होतेय १० पोत्यांची मळणी
- महापशुधन वार्ता
