दूध देणाऱ्या जनावरांचा महत्त्वाचा असा अवयव कोणता असेल तर ती त्याची ‘कास’. जशी ती जनावरांच्यासाठी महत्त्वाची आहे तशी ती पशुपालकांच्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
कारण कास चांगली असेल तर दूध उत्पादन चांगले मिळेल. त्यातून पशुपालकांचा चांगला फायदा होईल. यासाठी कासेची काळजी घेणे जरुरीचे आहे.
कासेची निगा कशी ठेवावी?
◼️ साधारण कालवड १५ महिन्याची व रेडी ३० महिन्यांची झाल्यानंतर हलक्या हाताने नियमित कासेवर मालिश करावे.
◼️ सोबत चांगला आहार दिल्यास कासेची वाढ होण्यास मदत होते.
◼️ गोठ्यातील गाई म्हशींच्या शेपटी, गुदद्वार, मांड्या, पोटऱ्या या नेहमी स्वच्छ राहतील याकडे लक्ष द्यावे.
◼️ गोठा देखील स्वच्छ व कोरडा असावा.
◼️ नियमित दूध काढण्यापूर्वी कास सौम्य व कोमट पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.
◼️ नंतर स्वच्छ कापडाने कास कोरडी करावी.
◼️ कास स्वच्छ करताना सडा कडून वरती कासेकडे हलक्या हाताने पुसून घ्यावे.
◼️ प्रत्येक वेळी वेगळे कापड वापरावे.
◼️ धारा काढताना देखील अंगठा न दुमडता संपूर्ण हाताचा वापर करून धार काढावी.
◼️ अंगठा दुमडून धार काढल्यामुळे सडावर नियमित पडणाऱ्या दाबामुळे गाठ उद्भवण्याच्या संभव असतो.
◼️ त्यामुळे पुढे जाऊन जनावरांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे पान्हा चोरणे, स्तनदाह यासारखे प्रकार घडतात.
◼️ धारा नेहमी पूर्ण हातानेच काढाव्यात.
◼️ जनावराने पूर्ण पान्हा घातल्याशिवाय धार काढू नये.
◼️ कासेत दूध शिल्लक राहणार नाही याची देखील काळजी घ्यावी.
◼️ दूध काढल्यावर परत का स्वच्छ धुऊन पुसून घ्यावी. व ती जंतुनाशक औषधी द्रावणात सर्व सड बुडवून घ्यावेत.
◼️ धार काढल्यानंतर गव्हाणीत वैरण टाकून द्यावी. जेणेकरून धार काढल्यानंतर जनावर खाली बसणार नाही.
◼️ धारा काढल्यानंतर सडाची छिद्रे २० ते २५ मिनिटे उघडी राहतात. अशा परिस्थितीत जर गाय खाली बसली तर गोठ्यातील घाण व रोगजंतूमुळे स्तनदाह होण्याची शक्यता असते.
◼️ हिवाळ्यात अनेक वेळा सडांना भेगा पडतात. त्यांना देखील औषधी द्रावणात बुडवल्या नंतर व्हॅसलीन किंवा तूप लावावे.
◼️ धार काढण्याच्या व्यक्तीचे देखील आपले हात स्वच्छ व नखे काढलेली असावीत.
◼️ गोठ्यात धारा काढताना सर्वप्रथम स्वच्छ व निरोगी असलेल्या गाई म्हशींची धार काढावी. नंतर आजारी जनावरांची धार काढावी.
◼️ गाय म्हैस वेळेवर आटवावी. आटवलेल्या काळात नवीन उती (पेशी) तयार होऊन जुन्या उतीची दुरुस्ती होत असते.
◼️ त्यामुळे कासेचे आरोग्य चांगले राहून पुढील वेतांमध्ये दुधाचे उत्पादन वाढते.
◼️ जनावर आटवल्यानंतर नजीकच्या तज्ञ पशुवैद्यकाकडून सडामध्ये योग्य ती प्रतिजैवके सोडून घ्यावीत.
◼️ सडांना,कासेला कोणत्याही परिस्थितीत जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
सर्वात महत्त्वाचे
प्रत्येक पशुपालकांनी पंधरा दिवसातून एकदा सर्व दुभत्या जनावरांच्या सडातील दुधाची सीएमटी टेस्ट (कॅलिफोर्निया मस्टाइटिस टेस्ट) करून घ्यावी. त्यामुळे सुप्त अवस्थेतील स्तनदाह कळतो. त्यावर तात्काळ उपचार करून होणारे नुकसान टाळता येते. अशा पद्धतीने कासेची काळजी घेऊन होणारे नुकसान आपण टाळू शकतो.
डॉ. व्यंकटराव घोरपडे
सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
अधिक वाचा: दुग्धव्यवसायात कडबाकुट्टी मशीनचा वापर केल्यामुळे कशी होते चाऱ्यात बचत? वाचा सविस्तर