पशुपालक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा - २ सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत अनुदानावर भरपूर दूध देणाऱ्या गायी-म्हशी, पशुधनाला पोषक खाद्य, चारा पिकांसाठी मोफत बियाणे देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, दूध उत्पादन सुधारणे आणि आधुनिक दुग्धव्यवसाय मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाचा विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प-२ टप्पा सुरु झाला आहे. त्याचा लाभ लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील पशुपालकांना मिळणार आहे.
या योजनेसंदर्भात लातुरातील जिल्हा पशु सर्वचिकित्सालयात विभागातील चार जिल्ह्यांचे जिल्हा उपायुक्त, सहआयुक्त आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांची बैठक विदर्भमराठवाडा दूध विकास प्रकल्पाचे संचालक डॉ. संजय गोरानी यांच्या अध्यक्षेखाली झाली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायचे सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, जिल्हा उपायुक्त डॉ. नरेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.
तसेच यावेळी प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांसाठीच्या विशेष क्यूआर कोडचे उद्घाटन झाले. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास योजनेचे सर्व घटक, पात्रता, अनुदान प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवड निकष, ऑनलाइन अर्ज लिंक याची माहिती थेट मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणारे ९ मोठे लाभ...
दिवसाला ८ ते १० लिटर दूध देणाऱ्या गायी/म्हशी ह्या ५० टक्के अनुदानावर मिळणार आहेत. उच्च उत्पादन क्षमता असलेली ७ महिन्यांची गाभण कालवड ही ७५ टक्के अनुदानावर, पोषक पशुखाद्य २५ टक्के अनुदानावर, एफएटी-एसएनएफ वाढवणारे खाद्य २५ टक्के अनुदान, बहुउपयोगी चारा पिकांसाठी १०० टक्के अनुदानावर मोफत बियाणे, ५० टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक कडबाकुट्टी यंत्र, मुरघास अनुदानावर मिळणार आहे. तसेच ३६ हजार शेतकऱ्यांना आधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रकल्पाचा काय फायदा?...
दूध उत्पादनात मोठी वाढ, शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ, दुष्काळी भागात चारा टंचाईवर उपाय, जनावरांतील बांध्या तत्त्वाचा त्रास कमी, उच्च वंशावळीतून गुणवत्ता सुधारणा, दुधाच्या दर्जामुळे बाजारभाव जास्त मिळणार आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांची आर्थिक लाभ होऊन प्रगतीस चालना मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?...
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. www.vmddp.com या संकेतस्थळावर अर्ज करता येतो. अधिक माहितीसाठी जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विनोद दुधाळे यांच्याशी अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पशुपालकांनी शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा. - डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, लातूर.