ग्रामीण भागात स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार जनावरांसाठी निवाऱ्याची सोय केली जाते. यामुळे विविध प्रकारचे गोठे पाहायला मिळतात.
काही ठिकाणी पाचटाच्या छपराखाली, घराच्या पडवीत, सोप्यावर किंवा घराबाहेर भिंतीला लागून आडोसा तयार करून गोठे उभारले जातात. तसेच काही ठिकाणी राहत्या घराच्या पाठीमागे बंदिस्त भागातही जनावरांसाठी निवाऱ्याची व्यवस्था केली जाते.
गोठा बांधणीतील महत्त्वाच्या बाबी
- गोठ्याची जागा निवडताना गावाबाहेर मुख्य रस्तालागत, बाजारपेठेपासून जवळ, पाण्याचा निचरा होणारी जागा, चारा उत्पादनासाठी सुपीक जमीन, पाण्याची उपलब्धता, वीजपुरवठा इत्यादी बाबी असणे आवश्यक आहे.
- गोठा बांधताना बांधकाम साहित्याची जुळवाजुळव करताना उपलब्ध परिस्थितीत कमी खर्चात परंतु टिकाऊ पर्यायांचा विचार करावा.
- गव्हाण व जनावरांना उभे राहण्याच्या जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्यतो गोठ्याची दिशा ही पूर्व-पश्चिम असावी.
- जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल या पद्धतीने गव्हाण बांधावी. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावा. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी.
- गोठ्यातील आच्छादित भाग हा सिमेंट काँक्रीटचा परंतु निसरडा नसावा आणि मोकळा भाग हा शक्यतो मुरमाड किंवा भाजलेल्या विटा वापरून अच्छादित केलेला असावा.
- पशुंचे शेण व मुत्र यांचा विसर्ग सहज होण्याकरिता जमिनीस गव्हाणीकडून गटाराकडे १:६० असा उतार दिलेला असावा.
- गोठ्यातील छत वजनाने हलके, कठीण, टिकाऊ असावे.
- जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहण्यासाठी टाकी किंवा हौद बांधावेत.
- गोठ्याचे छत-कच्चा गोठा असेल तर लाकूड, बांबू, गवत, कौलारू इत्यादी वस्तूंपासून बनलेला किंवा पक्का असेल तर सिमेंटचे किंवा लोखंडी पत्रे अथवा पफटीनचे बांधता येते.
- गोठ्याची उंची दोनपाकी असेल तर साधारणतः मध्यभागी १२-१४ फुट आणि दोन्ही बाजूस ९-११ फुट असावी किंवा एकपाकी असेल एका बाजूस १० फुट आणि दुसऱ्या बाजूस ८ फुट अशी असावी.
- गोठ्याची रुंदी ही ३० फुट पेक्षा अधिक असू नये असे असेल तर मग त्याप्रमाणात गोठ्याची उंची वाढवावी लागते.
- गोठ्याच्या लांबीच्या भिंती या ३ फुट उंच असाव्यात आणि त्यावर सुराक्षेकरिता लोखंडी जाळी बसवता येऊ शकते; म्हणजे गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश येईल व हवा खेळती राहील.
- गोठ्यात जनावरांना प्रवेश निर्गम करण्यासाठी किमान दीड मीटर रुंद दरवाजे असावेत.
- गोठ्याच्या कुंपणाचा मुख्य दरवाजा किमान ८ ते १० फुट रुंद असावा.
- जनावरांचे शेण, मूत्र गोठ्याबाहेर वाहून जाण्याकरिता गोठ्याच्या कडेने योग्य आकाराचे गटार करावे.
- गोठा बांधताना जनावरांना इजा होऊ नये याकरिता बांधकामाच्या पृष्ठभाग हा गुळगुळीत असावा.
अधिक वाचा: दुग्धव्यवसायात कडबाकुट्टी मशीनचा वापर केल्यामुळे कशी होते चाऱ्यात बचत? वाचा सविस्तर