Gujarat Election: गुजरातच्या या गावात ऐन 'निवडणुकीत शांतता', प्रचाराला बंदी; मतदान न केल्यास 'खिशाला कात्री'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 03:29 PM2022-11-23T15:29:57+5:302022-11-23T15:35:50+5:30

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे.

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचारात रमले आहेत. मात्र राजकोट जिल्ह्यातील एका गावात ऐन निवडणुकीत भयान शांतता आहे. राज समाधियाला हे गाव निवडणुकीच्या प्रचारापासून दूर आहे. याचे कारणही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे.

गावातील लोकांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना गावात प्रवेश आणि प्रचार करण्यास बंदी घातली आहे. मात्र गावातील लोक आगामी निवडणुकीत नक्कीच मतदान करणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे जे मतदान करणार नाहीत अशांना दंड देखील आकारला जाणार आहे.

राज समाधियाला गावातील लोकांचा असा समज आहे की, उमेदवारांना प्रचार करण्यास परवानगी देणे आपल्या भागासाठी हानिकारक आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाला प्रवेश आणि प्रचार करू दिला जात नाही. गावात प्रचाराला पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

खरं तर राज समाधियाला हे गाव राजकोटपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. मतदानात लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे यासाठी येथील ग्रामस्थांनी केवळ राजकीय प्रचारावरच बंदी घातली नाही, तर मतदान न करणाऱ्यांना 51 रुपयांचा दंडही ठोठावला जाणार आहे.

ग्रामविकास समितीने गावातील लोकांसाठी अनेक नियम तयार केले आहेत. गावातील लोक या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जातो. सक्तीचे मतदान करण्याचाही नियम आहे. गावात जवळपास 100 टक्के मतदान होत असते.

या गावचा सरपंच देखील सर्वांच्या संमतीने निवडला जातो. दंडाच्या निर्णयामुळे येथे जवळपास 100 टक्के मतदान झाल्याचे विद्यमान सरपंचांनी सांगितले. 1700 लोकसंख्या असलेल्या या गावाने एक समिती स्थापन केली आहे. मतदानाच्या काही दिवस आधी समितीचे सदस्य गावकऱ्यांची बैठक घेतात आणि कोणाला मतदान करता येत नसेल तर समितीला त्याचे कारण स्पष्ट शब्दांत सांगावे लागते.

या गावातील सरपंचानी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पक्षांना गावात प्रचार करून न देण्याचा नियम 1983 पासून लागू आहे. इथे कोणताच पक्ष आपल्या उमेदवाराचा अथवा पक्षाचा प्रचार करू शकत नाही. राज समाधियाला गावात प्रचार केला तर आपली मते कमी होतील, हा विश्वास देखील राजकीय पक्षांना आहे.

दरम्यान, समाजाला एक वेगळा संदेश देणारे राज समाधियाला हे गाव विकासाच्या बाबतीत देखील पुढे आहे. गावात वाय-फायद्वारे इंटरनेट कनेक्शन, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट अशा जवळपास सर्वच अत्याधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचे जीवन सुखकर झाले आहे. गावात सुमारे 995 मतदार आहेत. ते त्यांच्या इच्छेनुसार मतदान करतात.