शपथविधिवेळी ना जल्लोष, ना नारेबाजी; मात्र देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना केलेली 'ती एक' सूचना चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 11:59 AM2022-08-10T11:59:40+5:302022-08-10T12:00:02+5:30

राजभवनात झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभात नेहमीचा जल्लोष, नारेबाजी याचा मागमूसही नव्हता. अधूनमधून टाळ्या पडत होत्या इतकेच.

राजभवनात झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभात नेहमीचा जल्लोष, नारेबाजी याचा मागमूसही नव्हता. अधूनमधून टाळ्या पडत होत्या इतकेच. विस्ताराला झालेला अतिविलंब आणि त्यामुळे संपलेली उत्सुकता, त्यातच मर्यादित लोकांना दिलेला प्रवेश यामुळे जल्लोषी वातावरण हरविले होते.

सकाळी ११ वाजता शपथविधीला सुरुवात होणार होती, पण १५ मिनिटे विलंबाने हा समारंभ सुरू झाला. भाजपच्या ९ मंत्र्यांची नावे माध्यमांमधून आल्याने त्याबाबतची उत्सुकता निमाली होती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे गटातून कोण मंत्री होणार, याकडे लक्ष होते.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या शिंदे गटाचे राहुल शेवाळेंसह अन्य काही खासदार, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.

साडेदहाच्या सुमारास शिंदे गटातील मंत्र्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या मंचावरील खुर्च्यांवर चिकटवण्यात आल्या, तेव्हा कुठे चित्र स्पष्ट झाले. शपथ घेताना बरेचदा मंत्री शब्द चुकतात किंवा अडखळतात. तसे आज एकाही मंत्र्यांबाबत झाले नाही. श्रद्धास्थानांचा उल्लेख करणेही सगळ्यांनीच टाळले.

एकेक मंत्री शपथ घेऊन राज्यपालांशी हस्तांदोलन केल्यानंतर आधी उजव्या हातावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि नंतर डाव्या हातावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्री हस्तांदोलन करत असताना फडणवीस यांनी ‘आधी मुख्यमंत्री’ असे मंत्र्यांना हाताने खुणावले.

सुरेश खाडे यांच्या ९७ वर्षीय आई शपथविधी समारंभाला आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लवून नमस्कार केला. अब्दुल सत्तार यांनी सभागृहातील सर्वांकडे बघत नमस्कारासाठी हात जोडले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे पाहत त्यांनी दादा !तुम्हाला विशेष... असे म्हटले तेव्हा हशा पिकला.

एकेक मंत्री शपथ घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे येत होते. राज्यपाल वा शुभेच्छा!, अभिनंदन! असे म्हणत एकेकाचा उत्साह वाढवत होते. मंत्र्यांनी हात मिळविला की, ते लगेच फोटोग्राफरकडे पाहा, अशी सूचना करीत होते.