बजेट: लग्न झालेल्या अन् अविवाहितांसाठी वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब? अर्थसंकल्पात घोषणा झालेली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 06:37 PM2023-01-29T18:37:52+5:302023-01-29T18:47:54+5:30

आज विवाहित असो की अविवाहित सर्वांना एकच इन्कम टॅक्स स्लॅब लावला जातोय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुढील आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुढील आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी त्या ५-१० लाखांत वेगळा टॅक्स स्लॅब जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच करात सुट देण्याचा स्लॅबदेखील वाढविण्याची शक्यता आहे. आज विवाहित असो की अविवाहित सर्वांना एकच इन्कम टॅक्स स्लॅब लावला जातो. परंतू, आपल्याच देशात असे घडलेले की या दोघांनाही वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लागू झाला होता.

स्वातंत्र्यानंतर बजेटमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग आणि बदल करून पाहिले गेले आहेत. आता बजेट स्कीम हिंदीतूनही छापले जाते, परंतू त्याची सुरुवात पाच सहा दशकांपूर्वी झाली होती. याचवेळी एक वेगळा प्रयोग झाला होता. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

1955-56 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री सी.डी.देशमुख यांनी विवाहित-अविवाहितांसाठी स्वतंत्र आयकर स्लॅब आणला होता. कुटुंब भत्ता योजना सुरू करण्यासाठी हे केले होते. तेव्हापासून वार्षिक आर्थिक विवरण आणि स्पष्टीकरणात्मक मेमोरँडमची हिंदी आवृत्ती देखील प्रसारित केली जाते.

1950 च्या दशकात संपत्ती कर लागू करण्यात आला. यासोबतच प्राप्तिकरावरील कमाल दर पाच आण्यांवरून चार आण्यापर्यंत कमी करण्यात आला होता. 1955-56 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, विवाहित लोकांसाठी 1,500 रुपयांचा कर-सवलत स्लॅब वाढवून 2,000 रुपये करण्यात आला होता. तर अविवाहितांसाठी तो 1,000 रुपये करण्यात आला होता.

नियोजन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे हे पाऊल उचलण्यात आले होते. या क्रांतीकारी बदलामुळे ९० लाख रुपयांच्या महसुलाचे निव्वळ नुकसान झेलावे लागेल असा अंदाज लावण्यात आला होता.

आर्थिक वर्ष 1955-1956 साठी विवाहित व्यक्तींसाठी आयकर स्लॅब (प्रति रुपया) 1. टॅक्स स्लॅब रु 0 ते रु. 2,000 - देय: कोणताही आयकर देय नाही 2. रु. 2,001 ते रु. 5,000 टॅक्स स्लॅब - देय आयकर दर: रु. मध्ये नऊ पैसे. 3. रु. 5,001 ते रु. 7,500 टॅक्स स्लॅब - देय आयकर दर: एक आना आणि नऊ पैसे ते एक रुपया 4. रु. 7,501 ते रु. 10,000 चा कर स्लॅब - देय आयकर दर: एका रुपयात दोन आणे आणि तीन पैसे 5. रु. 10,001 ते रु. 15,000 टॅक्स स्लॅब - देय आयकर दर: एका रुपयात तीन आणे आणि तीन पैसे

अविवाहित व्यक्तींसाठी आयकर स्लॅब (प्रति रुपया) 1. रु. 0 ते रु. 1,000 - देय आयकर दर: आयकर नाही 2. रु 1,001 ते रु 5,000 - देय आयकर दर: रु 9 पैसे 3. रु. 5,001 ते रु. 7,500 - देय आयकर दर: एक आना आणि नऊ पैसे प्रति रुपया 4. रु. 7,501 ते रु. 10,000 - देय आयकर दर: दोन आणे आणि तीन पैसे प्रति रुपया

सीडी देशमुख हे फारसे कोणाला माहिती नसतील. परंतू त्यांची ओळख सांगतली तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. चिंतामण द्वारकानाथ देशमुख, CIE, ICS हे स्वातंत्र्यपूर्व काळातील एक भारतीय सरकारी अधिकारी होते. १९४३ मध्ये ब्रिटिशांनी त्यांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्त केलेले. आरबीआयचे ते पहिले भारतीय गव्हर्नर होते.

स्वातंत्र्यांनंतर नेहरुंच्या सरकारमध्ये ते 1950–1956 अशी सलग पाच वर्षे देशाचे अर्थमंत्री होते. NCAER चे फाऊंडर मेंबर होते. मंत्रिपदावरून पायऊतार झाल्यानंतर ते युजीसीचे पाच वर्षे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी त्यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले होते. त्याहून महत्वाचे म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचे सुपूत्र होते.