विराट कोहलीच्या अग्रस्थानाला धोका...

भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे, यात काहीच शंका नाही. आयसीसीच्या वन डे फलंदाजांमध्ये विराट अग्रस्थानावर आहे, परंतु त्याच्या या स्थानाला पाच खेळाडूंकडून धोका आहे.

पाकिस्तानचा बाबर आझम हा वन डेत 52च्या सरासरीने धावा कुटत आहे. क्रमवारीत तो सहाव्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 798 गुण आहेत आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तो आगेकूच करू शकतो.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन हा परिपक्त फलंदाज आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये तो आपल्या वैविध्यपूर्ण खेळाने सर्वांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता राखतो. तो आठव्या स्थानावर आहे.

भारताचा शिखर धवन सध्या चांगल्या फॉर्मात आहे. आशिया चषक स्पर्धेपासून त्याची बॅट चांगलीच तळपत आहे. 802 गुणांसह तो पाचव्या स्थानावर आहे. त्याची सातत्यपूर्ण खेळी संघासाठी फायद्याची ठरणारी असली तरी विराटच्या अग्रस्थानाला धोका पोहोचवणारी आहे.

इंग्लंडचा जॉनी बेअरस्टोव याची खेळ दिवसगणित उंचावत आहे. झटपट धावा करण्याचा त्याची शैली प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवणारी आहे.

भारताचा हिटमॅन रोहित शर्माच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. वन डे क्रमवारीत तो 818 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि विराटच्या स्थानाला त्याच्याकडून सर्वाधिक धोका आहे.