क्रिकेटमधील असे विक्रम ज्यावर फक्त भारतीयांचेच नाव!

भारतीय संघ जवळपास 87 वर्ष ( 1932 ) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. आज भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, वन डे आणि ट्वेंटी-20 क्रमवारीत भारत अव्वल तीन संघांत आहे. 1932 पासून भारतीय संघाने आणि खेळाडूंनी असे अनेक विक्रम नावावर केले की ते मोडणे कुणालाही शक्य नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे विक्रम जे भारतीय खेळाडूंच्याच नावावर आहेत.

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने कसोटी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या तीनही सामन्यांत शतक झळकावली आहेत. 1984-85च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अझरुद्दीनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने कोलकाता येथे 110, चेन्नईत 105 आणि कानपुर येथे 122 धावांची खेळी केली. पदार्पणाच्या सामन्यासह सलग तीन कसोटीत शतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम दोन गोलंदाजांनी करून दाखवला आहे. इंग्लंडच्या जिम लेकर यांनी 1956 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 53 धावांत 10 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर 1999 मध्ये भारताच्या अनिल कुंबळेने फिरोजशाह कोटला कसोटीत पाकिस्तानचा संपूर्ण संघ 74 धावांवर माघारी पाठवला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेण्याचा विक्रमही भारतीय खेळाडूच्या नावावर आहे. 2006 मध्ये इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत पहिल्याच षटकात हॅटट्रिक केली. त्याने पहिल्या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे सलमान बट्ट, युनिस खान आणि मोहम्मद युसूफ यांना बाद केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम आतापर्यंत दोघांनी केला आहे. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध ही फटकेबाजी केली होती. त्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीत युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये सहा षटकार खेचले होते.

सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूंत अर्धशतक केले होते. त्यात त्याने एकाच षटकात 6 षटकार खेचण्याचा विक्रमही केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. शतकांचे शतक पूर्ण करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटीत 51 तर वन डेत 49 शतकं झळकावली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने 34,357 धावा केल्या आहेत. जगातील कोणत्याही फलंदाजाला 30 हजार आंतरराष्ट्रीय धावा करता आलेल्या नाही.