आयपीएलमध्ये विराट कोहलीचंच नाणं खणखणीत वाजलं!

रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी अनेक विक्रमांना गवसणी घातली.

कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 17 वी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला.

अशी कामगिरी करणारा तो ख्रिस गेल नंतर दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 30 वर्षे व 151 दिवसांत त्याने हा पल्ला गाठला.

ट्वेंटी-20त 8000 धावा करणारा कोहली हा सातवा फलंदाज आहे आणि सुरेश रैनानंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे.

कोहलीनं 35 वी धाव घेताच भारतीय भूमीत ट्वेंटी-20तील 6000 धावा करण्याचा पराक्रमही नावावर केला. सुरेश रैनानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.

ख्रिस गेलने 213 सामन्यांत 8000 धावा केल्या, तर कोहलीला हा पल्ला गाठण्यासाठी 243 सामने खेळावे लागले. डेव्हिड वॉर्नर या क्रमवारीत 256 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीने 31 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता. आयपीएलमधील त्याचे हे 39वे अर्धशतक ठरले. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांत डेव्हिड वॉर्नर ( 42) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ गौतम गंभीर ( 36), सुरेश रैना ( 36) आणि रोहित शर्मा ( 35) यांचा क्रमांक येतो.

कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला. त्याने सुरेश रैनाचा 5086 धावांचा टप्पा ओलांडला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोघांनी आघाडी मिळवली. कोहली व डिव्हिलियर्स यांच्यात 9 शतकी भागीदारी झाल्या आहेत.