वर्ल्ड कपमध्ये भारतीय गोलंदाजांचीच 'तुफानी' चालणार

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. 1983 आणि 2011नंतर भारतीय संघ पुन्हा वर्ल्ड कप उंचावेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांत अव्वल कामगिरी करत आहे. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप हा भारताचाच, असा ठाम विश्वास चाहत्यांना आहे. भारतीय संघ 5 जूनला वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळेल. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजांची कामगिरी हे भारताचे प्रमुख अस्त्र आहे. त्यांच्याच जोरावर भारताने अविश्वसनीय विजय मिळवले आहेत आणि त्यांच्याच जोरावर भारत वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहात आहे.

रवींद्र जडेजाने 2013च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान पटकावला होता. मर्यादित षटकाच्या सामन्यांसाठी उत्तम अष्टपैलू पर्याय, जो तळाला येऊन फटकेबाजी करू शकतो. 2018च्या आशिया चषक स्पर्धेत दुखापतग्रस्त अक्षर पटेल याला बदली खेळाडू म्हणून तो पुन्हा संघात आला आणि त्याने चार सामन्यांत सात विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्यानं संघातील स्थान पक्कं केलं.

हार्दिक पांड्या हा वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील विधानामुळे त्याला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, त्याने कमबॅक करताना न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात दोन विकेट आणि एक अप्रतिम झेल टिपला. 2017साली तो भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्याने 28 सामन्यांत 31 विकेट घेतल्या होत्या. गोलंदाजीबरोबरच पांड्या फलंदाजीतही आपली छाप पाडण्यास सक्षम आहे.

न्यूझीलंड दौरा गाजवणाऱ्या मोहम्मद शमीने आपला फिटनेस दाखवून दिला आहे. भारताकडून सर्वात जलद 100 वन डे विकेट घेण्याचा पराक्रम त्याने नावावर केला आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या सलामीच्या जोडीला सतावण्याची जबाबदारी तो चोखपणे पार पाडतो.

जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारचे नाव घेतले जाते. 2017 च्या आसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याने पटकावला होता. विकेट घेण्याबरोबरच तो प्रतिस्पर्धी संघाच्या धावांवर चाप बसवण्याची भूमिका चोखपणे पार पाडतो.

युजवेंद्र चहल हा भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातील कायमस्वरुपी सदस्य आहे. 28 वर्षीय चहलने गतवर्षी भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत दुसरे स्थान पटकावले होते. त्याने 17 वन डे सामन्यांत 29 विकेट घेतल्या होत्या. प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवण्याची कला त्याच्या गोलंदाजीत आहे.

कुलदीप यादवच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज चांगलेच हतबल झालेले पाहायला मिळत आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत 8 विकेट घेतल्या आहेत. भारताच्या या मालिका विजयात त्याचा सिंहाचा वाटा आहे. वन डेत सर्वात जलद 50 विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.

जसप्रीत बुमरा.... हा भारतीय संघाचा कणा आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विविधपूर्ण गोलंदाजी करण्यात महारत असलेला हा गोलंदाज भल्याभल्या फलंदाजांना सतावतो. वर्ल्ड कपमध्ये भारताचा तोच महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.