पहिल्या वनडेत भारताने लोळवलं,ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या चेन्नई येथील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा फडशा पाडला.

टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अक्षरशः हतबल झाले होते. डकवर्थ लुइस नियमानुसार मिळालेल्या 21 षटकात 164 धावांच्या आव्हानाचं लक्ष्य घेऊन उतरलेला कांगारूंचा संघ 9 गडी बाद केवळ 137 धावा करू शकला आणि भारताने 26 धावांनी विजय मिळवला.

भारताकडून युजवेंद्र चहलने तीन तर हार्दिक पांड्या , कुलदिप यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले. बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला एक गडी बाद करण्यात यश आलं.

यासोबत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

धोनीने 88 चेंडूंमध्ये केलेल्या 79 धावांच्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार फटकावले आणि वनडे कारकिर्दितील 66 वं अर्धशतक पूर्ण केलं. यासोबत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांचं शतक पूर्ण केलं. या खेळीसाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.

अष्टपैलू हार्दिक पांड्याने( 66 चेंडूत 83 धावा ) केलेली तुफान फटकेबाजी आणि अखेरच्या षटकांमध्ये धोनीने केलेल्या घणाघाती प्रहारामुळे भारताला 250 धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आलं. त्यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.