मुलतानच्या सुलतानचा वाढदिवस...

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याचा आज 40 वा वाढदिवस. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेहवागने निवृत्ती घेतली असली तरी त्याचा चाहतावर्ग आजही तितकाच आहे. वाढदिवसानिमित्त सेहवागच्या काही विशेष विक्रमांची माहिती..

कसोटी क्रिकेटमध्ये 100 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने मोठी खेळी साकारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने 2008 मध्ये चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 104.93 च्या स्ट्राईक रेटने 319 धावा केल्या होत्या.

सर डॉन ब्रॅडमन (334, 304, 299*) यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल तीन वेळा 290 पेक्षा धावा (319, 309, 293)करण्याचा विक्रम सेहवागने केला आहे.

कसोटीत कमी चेंडूंत ( 278) त्रिशतक करण्याचा विक्रमही सेहवागच्या नावावर आहे. त्याशिवाय कसोटीत त्रिशतक आणि वन डेत द्विशतक करणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनेही अशी कामगिरी केली आहे.

कसोटीत सर्वात जलद 10 द्विशतकांमध्ये सेहवागच्याच पाच खेळींचा समावेश आहे. त्याने कसोटीत सलग 11 असे शतक झळकावली आहेत ज्यात त्याने 150 हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.

कसोटीत दोन त्रिशतक करणारा सेहवाग हा चौथा फलंदाज आहे. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा आणि ख्रिस गेल यांनी अशी कामगिरी केली आहे.

सेहवागने चार वेळा 250 हून अधिक धावांची खेळी केली आहे. या विक्रमात सर डॉन ब्रॅडमन ( 5 ) आघाडीवर आहेत. कसोटी क्रिकेटच्या एका दिवसात सर्वाधिक 284 धावा करणारा सेहवाग एकमेव भारतीय फलंदाज आहे.

कर्णधार म्हणून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी वैयक्तिक ( 219) खेळीचा विक्रम सेहवागच्या नावावर आहे. त्याच्यानंतर रोहित शर्माचा ( 208) क्रमांक येतो.