बर्थ डे स्पेशलः हिटमॅन रोहितच्या 'या' विक्रमांनी जगाला 'याड' लावलं!

क्रिकेटविश्वात 'हिटमॅन' म्हणून नावलौकिक मिळवणारा मुंबईकर रोहित शर्माचा आज वाढदिवस. टीम इंडियाचा हा वीर आज ३१ वर्षांचा होतोय. वयाच्या २०व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितनं गेल्या ११ वर्षांत असे काही विक्रम रचलेत, जे मोडले जाणं खूपच कठीण दिसतंय. अशाच पाच विक्रमांवर एक दृष्टिक्षेप...

ट्रिपल धमाका - वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं!... वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिलं द्विशतक झळकावून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सगळ्यांनाच थक्क केलं होतं. कारण, असा पराक्रम होऊ शकतो, याची कल्पनाही तोपर्यंत कुणी केली नव्हती. आजही सचिन सोडून फक्त चार जणांना ही किमया करता आलीय. त्यात वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, मार्टिन गप्टील आणि रोहित शर्माचा समावेश आहे. आश्चर्य म्हणजे, रोहित शर्मानं एक-दोन नव्हे तर तब्बल तीन द्विशतकं झळकावली आहेत. २०१४ - १७३ चेंडूत २६४ धावा वि. श्रीलंका / २०१३ - १५८ चेंडूत २०९ धावा वि. ऑस्ट्रेलिया / २०१७ - १५३ चेंडूत नाबाद २०८ धावा वि. श्रीलंका

अबबबब, २६४ धावांचा पाऊस.... वनडेतील तीन द्विशतकांपैकी एका द्विशतकाने क्रिकेटप्रेमींना याडच लावलं होतं. २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितच्या बॅटमधून २६४ धावांचा धो-धो पाऊस पडला होता. या आकडा गाठणं 'मुश्किल ही नही नामुमकीन है...' असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

सुस्साट... टी-२० तील सगळ्यात वेगवान शतक! श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकून रोहित शर्मानं डेव्हीड मिलरच्या वेगवान शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. या सामन्यात रोहितनं ४३ चेंडूत ११८ धावा फटकावल्या होत्या. अन्य कुठल्याही भारतीय शिलेदाराला अजून टी-२० मध्ये एवढा पल्ला गाठता आलेला नाही.

एकमेव... टी-२० मध्ये दोन शतकं झळकावणारा एकटा भारतीय! वनडेत द्विशतक झळकावणं जितकं कठीण आहे, तितकंच टी-२० मध्ये शतक ठोकणं. परंतु, रोहितनं हा पराक्रमही दोन वेळा केला आहे. श्रीलंकेविरुद्ध ११८ धावा फटकावणाऱ्या रोहितनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०६ धावांची खेळी केली होती. के एल राहुल (११०) आणि सुरेश रैना (१०१) यांनी टी-२० मध्ये एकेक शतक झळकावलंय.

सुपरहिट... आयपीएलमधील सगळ्यात यशस्वी कर्णधार! इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत रोहित शर्मा सगळ्यात यशस्वी कर्णधार ठरलाय. मुंबईनं त्याच्याच नेतृत्वाखाली तीन (२०१३, २०१५, २०१७) जेतेपदं पटकावली आहेत.