ही ६६वी कला खरंच शिकण्यासारखी
By अजय परचुरे | Published: May 10, 2019 05:02 PM2019-05-10T17:02:26+5:302023-08-08T20:27:58+5:30
६६ व्या कलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्या काही उठाठेवी करतो त्याची गोळाबेरीज म्हणजे ६६ सदाशिव सिनेमा...
- अजय परचुरे
भांडण करणे ही एक कला असू शकते, असं मानणारा एक व्यक्ती या भूतलावर असतो. आपल्यामध्ये ही कला ठासून भरलेली आहे याची जराही कल्पना नसलेला पुण्यातील हा गृहस्थ पुढे जाऊन ही भांडण नावाची ६६ वी कला शिकवण्याचे वर्गच सुरू करतो. ६६ सदाशिव सिनेमाची कथा ही व.पु.काळेंच्या भांडणारे जोशी या कथेपासून प्रेरित आहे. स्पष्टपणे आपले मुद्दे मांडणारा एक व्यक्ती आपल्या या कलेला ६६ व्या कलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्या काही उठाठेवी करतो त्याची गोळाबेरीज म्हणजे ६६ सदाशिव सिनेमा...
सिनेमाची कथा अतिशय रंजक आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत राहणारे प्रभाकर श्रीखंडे (मोहन जोशी) . व्यवसायाने ते छायाचित्रकार आहेत. मात्र सध्याच्या डिजीटल युुगातही त्यांना अजूनही आपल्या जुन्या छायाचित्रणाच्या कौशल्यावर जास्त विश्वास आहे. त्यामुळे मोबाईल,फेसबुकच्या सोशल जगातही त्यांचा व्यवसाय हा फारसा सोसेल असा सुरू नाहीये. प्रभाकर श्रीखंडेच्या पत्नी मीना श्रीखंडे (वंदना गुप्ते) या भणंग बनवण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावतात. या दांमपत्याची मुलगी कादंबरी श्रीखंडे(अपूर्वा मोडक) आता लग्नाची झाली आहे. मात्र आपल्या वडिलांच्या विक्षिप्त बोलण्याच्या पध्दतीने,वागण्याने सगळ््याच गोष्टी फसत असतात. मात्र कादंबरीच्या आयुष्यात आलेला अबीर देशपांडे ( योगेश देशपांडे) या कलेला एक कलाटणी देतो. अबीर ६५ व्या कलेत म्हणजेच जाहिरात विश्वाच्या दुनियेत तरबेज असतो. तो प्रभाकर श्रीखंडे यांना त्यांच्यातील ६६ व्या कलेला जन्म देण्यास भाग पाडतो. आणि प्रभाकर श्रीखंडे हे या भांडणाच्या,विक्षिप्तपणाचे पुण्यात चक्क कलास सुरू करतात. ह्या क्लासला वाढत जाणारी लोकप्रियता पाहून शिक्षण मंडळांच्या,स्थानिक नगरसेवकाच्या पोटात दुखू लागतं ते त्यात अडथळे आणण्यास सुरवात करतात. मात्र प्रभाकर श्रीखंडे या सर्व विरोधकांना आपल्या या कलेद्वारे पुरून उरतात की नाही .. आपल्या कलेला राजमान्यता मिळवून देतात की नाही ह्याचा सुंदर धांडोेळा म्हणजे ६६ सदाशिव.
सिनेमाचा विषय जरी चांगला असला तरी संवादांमध्ये आणि मुख्यतहा पटकथेमध्ये सफाईदारपणा अजून अपेक्षित होता. योगेश देशपांडे यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. त्यांनी सुरवात चांगली केली आहे. मात्र तांत्रिक अंगाने त्यांनी अजून सक्षम होणे जास्त गरजेचे आहे. योगेश देशपांडे यांनी आजच्या काळातील भरभरून चालणाºया सोशल मिडियाचा कथा पुढे जाण्यासाठी चपखल वापर केला आहे. मुळात योगेश देशपांडे यांना कलाकार निवडीसाठी १०० गुण द्यायला हवेत कारण मूळ व्यक्तिरेखेसोबतच त्यांनी छोट़्या छोट्या व्यक्तिरेखेसाठी कलाकारांची उत्तम निवड केली आहे. नरेंद्र भिडे यांचं संगीतही सिनेमाच्या कथेनुसार अनुरूप झालं आहे.
या सिनेमाचे खरे सुपरस्टार आहेत मोहन जोशी. मोहन जोशींनी इरसाल, नमुनेदार प्रभाकर श्रीखंडे अतिशय अफलातून रंगवला आहे. काही सिनमध्ये मोहन जोंशीना ऐकत राहावं इतका त्यांचा त्या पात्रातील सहज वावर मन प्रसन्न करतो. वंदना गुप्तेंनीही मीना श्रीखंडे त्यांच्या नेहमीच्याच स्टाईलमध्ये फर्मास रंगवल्या आहेत. अर्पूवा श्रीखंडे या अभिनेत्रीने कादंबरीच्या भूमिकेत जान आणलीय. समजूतदार ,आपल्या वडिलांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी कादंबरी तिने समजदार पध्दतीने साकारली आहे. अबीरच्या भूमिकेत योगेश देशपांडेनीही चांगली कामगिरी केली आहे,महेश मांजरेकर, प्रवीण तरडे, आसावरी जोशी, प्रणव रावराणे, जयंत सावरकर, विजय निकम, विशाखा सुभेदार ह्या कलाकारांच्या अगदीच छोट्या छोट्या भूमिका आहेत मात्र प्रत्येकाने आपली भूमिका सुंदर रंगवली आहे.
दिग्दर्शकाचा नवखेपणा संवाद,पटकथा आणि दिर्ग्दशनातून जरी दिसला असला तरी कलाकारांच्या चोख कामगिरीसाठी हा सिनेमा एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे. काय माहित रोजच्या धावपळीच्या जगात तुम्हांलाही या ६६ व्या कलेचा कुठेतरी फायदा झाला तर... मोहन जोशींच्या अफलातून भूमिकेसाठी ६६ सदाशिवला एकदा भेट द्यायला काहीच हरकत नाहीये.