सोनल चौहान झळकणार महेश मांजरेकरांच्या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 04:02 PM2018-07-31T16:02:21+5:302018-07-31T16:08:16+5:30
'जन्नत' चित्रपटानंतर हिंदीसोबतच कन्नड, मल्याळम व तेलगू सिनेमात रमलेली सोनल जे. पी. दत्ता यांच्या 'पलटन' चित्रपटात ती दिसणार आहे.
बॉलिवूडचा सीरियल किसर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता इमरान हाश्मीसोबत 'जन्नत' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री सोनल चौहान 'पलटन' चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर ती निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'जन्नत' चित्रपटानंतर हिंदीसोबतच कन्नड, मल्याळम व तेलगू सिनेमात रमलेली सोनल जे. पी. दत्ता यांच्या 'पलटन' चित्रपटात ती दिसणार आहे. तसेच तिने नुकताच महेश मांजरेकर यांचा आगामी सिनेमादेखील साइन केला आहे. मागील काही वर्षांपासून मराठी चित्रपटांमध्ये व्यग्र असलेले मांजरेकर पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टीकडे वळले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र कलाकारांची निवड झाल्याचे समजते आहे. या चित्रपटात सोनल व्यतिरिक्त विद्युत जामवाल व श्रुती हसन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार महेश मांजरेकर 1999 साली प्रदर्शित झालेल्या 'वास्तव' चित्रपटाचा सीक्वल बनवणार आहेत. यात सोनल, विद्युत व श्रुती व्यतिरिक्त नसीरूद्दीन शाह, तिग्मांशु धुलिया, अमोल पालेकर व प्रतीक बब्बर देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात सोनल चंद्रमुखी नावाच्या व्यक्तिरेखेत दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर ड्रामा असलेल्या या चित्रपटासाठी सोनलने रिहर्सलला सुरूवात केली आहे. या चित्रपटासाठी सोनल रंगभूमीवरील कलाकारांसोबत सराव करत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
सोनलने 2010 साली 'जन्नत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 2012 साली शेवटचे बॉलिवूडमध्ये 'थ्रीजी' चित्रपटात तिने काम केले होते. त्यानंतर आता ती 'पलटन'मध्ये दिसणार आहे. 'पलटन'मध्ये सोनलने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.