IPL 2019 : विराट कोहलीचे शतक, राजस्थानविरुद्ध नोंदवला विक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची पराभवाची मालिका कायम आहे. मंगळवारी विराट कोहलीच्या संघाला पराभवाची चव चाखावी लागली. राजस्थान रॉयल्सने त्यांच्यावर 7 विकेट राखून मात करताना आयपीएलच्या 12व्या मोसमात पहिल्या विजयाची चव चाखली. या सामन्यात बंगळुरूला हार मानावी लागली असली तरी कॅप्टन कोहलीनं विक्रमी शतक साजरे केले.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 4 बाद 158 धावा केल्या. पार्थिव पटेल ( 67) आणि मार्कस स्टोइनीस ( 31) यांनी संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. सलामीला आलेल्या कोहलीला 23 धावा करता आल्या.

राजस्थानने हे लक्ष्य 19.5 षटकांत 7 विकेट राखून पार केले. जोस बटलर ( 59), स्टीव्हन स्मिथ ( 38), राहुल त्रिपाठी (34) आणि अजिंक्य रहाणे ( 22) यांनी उपयुक्त खेळी केली.

बंगळुरूचा हा सलग चौथा पराभव ठरल्याने लीगमधील आव्हान टीकवण्यासाठी त्यांना पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. पण, या सामन्यात कोहलीनं विक्रम केला.

कर्णधार म्हणून आयपीएलमधील हा कोहलीचा शंभरावा सामना ठरला आणि अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. या क्रमवारीत महेंद्रसिंग धोनी ( 162 सामने ) आणि गौतम गंभीर (129) आघाडीवर आहेत.

कोहली बंगळुरूकडून 2008 पासून खेळत आहे आणि मागील 7 मोसमात त्याच्याकडेच कर्णधाराची जबाबदारी आहे. मात्र, बंगळुरूला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही.

बंगळुरूने 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्या मोसमात डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने जेतेपद पटकावले होते.

आयपीएलमध्ये 50 हून अधिक सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या आठ संघांच्या कर्णधारांमध्ये कोहलीची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली आहे.