बॉक्सिंग डे' कसोटीत विराट कोहली पाडणार विक्रमांचा पाऊस!

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या 'बॉक्सिंग डे' कसोटीसाठी भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया सज्ज झाले आहेत. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. ऑस्ट्रेलियाने पिछाडीवरुन मुसंडी मारताना मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. या सामन्यात भारत नव्या सलामीच्या जोडीने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीवर भारतीयांच्या नजरा खिळल्या आहेत. कोहलीलाही या सामन्यात दहा विक्रम खुणावत आहेत.

विराट कोहलीला एका वर्षात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर करण्यासाठी 181 धावांची आवश्यकता आहे. त्याने 2018 मध्ये 2653 धावा केल्या आहेत आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या 2005 चा 2833 धावांचा विक्रम त्याला खुणावत आहे.

बॉक्सिंग डे कसोटीत कोहलीने शतक झळकावल्यात कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक 12 आंतरराष्ट्रीय शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी तो बरोबरी करू शकतो. तेंडुलकरने 1998 साली हा विक्रम केला होता. कोहलीने 2018 मध्ये पाच कसोटी आणि 6 वन डे शतकं झळकावली आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतकं करणाऱ्या सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचीही कोहलीला संधी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतकं करण्याऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम तेंडुलकरच्या ( 11) नावावर आहे.

कॅलेंडर वर्षात परदेशात कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर करण्यासाठी कोहलीला 82 धावा हव्या आहेत. हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने 2002 मध्ये 1137 धावा केल्या होत्या आणि कोहलीच्या नावावर 1065 धावा आहेत.

कर्णधार म्हणून कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही कोहलीला खुणावत आहे. मेलबर्न कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून 156 धावा केल्यास तो दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथचा 1212 ( 20 डाव 2008 साल) धावांचा विक्रम मोडेल.

मेलबर्नवर शतक झळकावताच कोहली वेस्ट इंडिजचे दिग्गज गॅरी सोबर्स यांच्या कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करेल.

कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियात क्लाईव्ह लॉईड यांनी चार कसोटी शतकं झळकावली आहेत. कोहलीच्या नावावर ऑस्ट्रेलियात चार शतकं आहेत आणि त्याला लॉईड यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानी येण्यासाठी कोहलीला 123 धावा कराव्या लागणार आहेत. या क्रमवारीत लॉईड ( 1301), स्मिथ ( 748) आणि आर्ची मॅकलॅरेन (709) आघाडीवर आहेत.

मेलबर्न कसोटीत विजय मिळवताच परदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या आशियाई कर्णधाराच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल. भारताच्या सौरव गांगुलीने परदेशात सर्वाधिक सहा कसोटी विजय मिळवले आहेत.

एक शतक आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमात कोहलीची तिसऱ्या स्थानी झेप... कोहलीच्या नावावर 63 आंतरराष्ट्रीय शतक आहेत आणि तो श्रीलंकेच्या कुमार संगकारासह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. या क्रमवारीत तेंडुलकर (100) आणि पाँटिंग ( 71) आघाडीवर आहेत.