'विराट'सेनेला किवींच्या 'या' खेळाडूंकडून धोका

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या वन डे सामन्यात भारताने विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. असे असले तरी शनिवारी माऊंट मौंगानूई येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात यजमान मुसंडी मारण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना कमी लेखण्याची चूक 'विराट'सेनेला महागात पडू शकेल. न्यूझीलंडचे हे सहा खेळाडू भारतीय खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरू शकतील.

मधल्या फळीतील फलंदाज रॉस टेलर याचे नाव आघाडीवर आहे. त्याचा सध्याचा फॉर्म हा बोलका आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने 93.67 च्या सरासरीने 281 धावा केल्या होत्या.

27 वर्षीय हेन्री निकोल्स हा हुकूमी एक्का ठरू शकतो. त्याला पहिल्या सामन्यात अपयश आले. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या वन डे सामन्यात 124 धावा चोपून कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

किवींचा कर्णधार केन विलियम्सन हा भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. पहिल्या वन डेत न्यूझीलंडचे अन्य फलंदाज अपयशी ठरत असताना विलियम्सनने एकट्याने खिंड लढवली. त्याने 64 धावा केल्या होत्या.

श्रीलंकेविरुद्ध माऊंट मौंगानूई येथे 138 धावांची खेळी करणारा मार्टिन गुप्तील भारताविरुद्धही पुनरावृत्ती करण्यासाठी आतुर असेल. पहिल्या सामन्यात त्याला मोहम्मद शमीने स्वस्तात बाद केले होते.