'कॅप्टन' कोहलीचे 'हे' आकडे पाहून कांगारू चक्रावतील!

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. विशाखापट्टणम येथे आज पहिला ट्वेंटी-20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात यजमान भारताचे पारडे जड आहे आणि कर्णधार विराट कोहलीची विक्रमांची आकडेवारीही ऑसी संघाच्या मनात धडकी भरवणारी आहे.

कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 13 ट्वेंटी-20 सामन्यांत 61 च्या सरासरीनं पाच अर्धशतकांसह 488 धावा चोपल्या आहेत. एकाद्या संघाविरुद्ध कोणत्याही खेळाडूने केलेली ही सर्वोत्तम खेळी आहे. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील ( वि. पाकिस्तान) 25 गुणांनी दुसऱ्या स्थानावर आहे.

कर्णधार म्हणून कोहलीची ट्वेंटी-20 तील आकडेवारी थोडी चिंतेत टाकणारी आहे. त्याला 23 सामन्यात केवळ 34 च्या सरासरीनं 510 धावा करता आल्या आहेत. घरच्या मैदानावर कर्णधार म्हणून त्याने 8 ट्वेंटी-20 सामन्यांत 178 धावा केल्या आहेत.

मात्र, विशाखापट्टणम येथेली डॉ. वाय. एस. राजसेखरा रेड्डी स्टेडियमवर कोहलीची बॅट चांलगीच तळपली आहे. त्याने येथे 118, 117, 99, 65, 167, 81 आणि नाबाद 158 धावांची खेळी साकारली आहे आणि त्याची सरासरी 134 हून अधिक राहिली आहे.

कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 5 अर्धशतकं झळकावली आहेत. एकाच प्रतिस्पर्धीविरुद्ध सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमात त्यानं श्रीलंकेच्या कुशल परेराशी बरोबरी केली आहे. ऑसीविरुद्धच्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने एक अर्धशतक झळकावल्यास या विक्रमात तो आघाडी घेऊ शकतो.