Ganesh Chaturthi 2023: गणेश उत्सवाच्या झगमगाटात 'पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचे' अधिक महत्त्व का? वाचा गणेशाचा भक्तांशी संवाद!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 07:00 AM2023-09-13T07:00:00+5:302023-09-13T07:00:02+5:30

Ganesh Chaturthi 2023: आपण आपल्या आवडीप्रमाणे गणेशोत्सवाची तयारी करतो, पण बाप्पाला काय आवडते हे जाणून घेता आले तर? असेच एक मनोगत वाचा. 

Ganesh Chaturthi 2023: Why more importance of 'Environmental Ganesh Chaturthi' in the blaze of Ganesh Utsav? Read Ganesha's communication with devotees! | Ganesh Chaturthi 2023: गणेश उत्सवाच्या झगमगाटात 'पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचे' अधिक महत्त्व का? वाचा गणेशाचा भक्तांशी संवाद!

Ganesh Chaturthi 2023: गणेश उत्सवाच्या झगमगाटात 'पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचे' अधिक महत्त्व का? वाचा गणेशाचा भक्तांशी संवाद!

googlenewsNext

''बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झाली, तरी राहून राहून काहीतरी मिसिंग आहे, असं मला का वाटतंय? आपला बाप्पा हटके असावा, याच अट्टहासामुळे हे वाटत नसावं ना? केवढा तो मनाचा गोंधळ! सांगायचा कोणाला नि ऐकणार तरी कोण???''

''कोण कशाला? मी ऐकेन ना!'' 

''कोण बोललं? कोणाचा आवाज आहे हा? कोण आहे इथे?''

''अगं वेडे घाबरतेस काय? मी... तुझा बाप्पा! पुढच्या वर्षी लवकर या म्हणत मला भरल्या डोळ्यांनी निरोप दिला होतास ना? आता आलोय तुझ्या भेटीला तर ओळखलं नाहीस?''

''बाप्पा तू ??? तू खरंच आलायस? माझा विश्वासच बसत नाहीये!!! थांब, आपला सेल्फी काढू, मला सगळ्यांना दाखवता येईल. लाईक्स, शेअर, कमेंट्स काही विचारू नकोस! यंदा मला हटके काहीतरी करायचं होतंच, तू येऊन माझी इच्छा पूर्ण केलीस बघ!''

''बंद कर तो मोबाईल आधी, नाहीतर हा मी चाललो!''

'' अरे अरे, थांब रागवू नकोस. हा बघ, केला फोन स्विच ऑफ!!!''

''तुला काहीतरी हटके करायचं होतं  ना? मीच सुचवतो. करशील?'''

'' का नाही? अरे तुझ्याचसाठी एवढा थाट माट केलाय बघ. आणखी काय हवं तू बोल फक्त! लायटिंग्स, डेकोरेशन, फुलांची सजावट, मिठाई, मोदक....''

''हेच सगळं मला नकोय!''

''काय????? तुला हे नकोय? अरे तुला आवडावं म्हणून तर केलं एवढं सगळं!''

''तुमचा भोळा भाव समजू शकतो. तुमचा पाहुणचारही मला आवडतो. पण मला काय आवडतं ते तुम्ही मला दिलं तर मला आणखी आनंद होईल!''

''बाप्पा सांग मी काय करू?''

''बागेतली थोडीशी माती घे आणि त्याची छोटीशी मूर्ती बनव. अगदी तळहाताएवढी. स्वच्छ पाटावर बसायला आसन दे. 
सोन्याची फुलं, सोन्याच्या दुर्वा मला नको. खऱ्या दुर्वांची जुडी आणि बागेत उन्मळून पडलेली दोन चार फुलंही मला पुरे! 
तू जेवशील त्याचाच मलाही दे नैवेद्य. कानावर पडू दे तुझ्या आरतीचा मंजुळ सूर 
आणि शंखाच्या मंगल ध्वनीने कर माझी सकाळ प्रसन्न!
तुझ्या मित्र मैत्रिणींना बोलव माझ्या भेटीला. 
बाप्पा म्हणजे मी काही वेगळा नाही, तुमच्या घरचा पाहुणा. 
या साध्याशा पाहुणचारानेसुद्धा प्रसन्न होणारा आणि भरपूर आशीर्वाद देणारा. 
अशा सहवासाने आपल्यातलं सात्विक नातं खऱ्या अर्थाने जपलं जाईल आणि बहरतही जाईल. 
जड अंत:करणाने मला निरोप देशील तेव्हा माझाही उर भरून येईल. 
देईन तुला वचन पुनर्भेटीचं, कारण तुझ्या बोलावण्यात असेल प्रेमळ अगत्य!  
विसर्जन करतानाही एक गोष्ट लक्षात ठेव, घरच्याच पाण्याच्या बादलीत मूर्तीला निरोप दे. 
त्या पाण्याचा पुनर्वापर घरच्या बगिच्यात कर, हवं तेव्हा कधीही माझा आठव कर. 
येईन तुझ्या भेटीला आढे वेढे न घेता, कारण असाच हटके गणेशोत्सव प्रिय आहे मला!

''निसर्ग आणि मनुष्य यांची सांगड घालणाऱ्या या उत्सवाचं मूळ स्वरूप आम्ही विसरलो होतो बाप्पा! तू आठवण करून दिलीस आता तू सांगितलीस तशीच तयारी करणार आणि माझा बाप्पा सगळ्यांपेक्षा हटके असणार!!!'' 

मंगल मूर्ती मोरया! गणपती बाप्पा मोरया!

Web Title: Ganesh Chaturthi 2023: Why more importance of 'Environmental Ganesh Chaturthi' in the blaze of Ganesh Utsav? Read Ganesha's communication with devotees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.