जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?

By बाळकृष्ण परब | Published: May 3, 2024 12:54 PM2024-05-03T12:54:30+5:302024-05-03T12:56:12+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून मागचे जवळपास दोन सव्वा दोन महिने सुरू असलेला महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर परवा सुटला. अनेक महत्त्वाच्या जागांवरून मित्रपक्षांसोबत जोरदार रस्सीखेच आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चांचा काथ्याकूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं १५ जागा मिळून आपली ताकद सिद्ध केली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Eknath Shinde won the seat-sharing negotiations, taking the constituencies it wanted; What exactly did BJP achieve? | जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?

जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?

-बाळकृष्ण परब
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून मागचे जवळपास दोन सव्वा दोन महिने सुरू असलेला महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर परवा सुटला. अनेक महत्त्वाच्या जागांवरून मित्रपक्षांसोबत जोरदार रस्सीखेच आणि मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चांचा काथ्याकूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं १५ जागा मिळून आपली ताकद सिद्ध केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सोबत आलेल्या खासदारांचे मतदारसंघ असलेल्या जागांपैकी पालघरचा अपवाद वगळता इतर सर्व जागा शिंदे गटाला मिळाल्या. सोबतच दक्षिण मुंबई आणि ठाणे हे मतदारसंघही आपल्याकडे खेचून आणण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. विशेषत: ठाणे आणि नाशिक या मतदारसंघांवरून महायुतीमध्ये जबरदस्त खेचाखेची झाली. मात्र एकनाथ शिंदे यांनी मोठ्या कौशल्याने हे मतदारसंघ आपल्याकडे राखले. त्यामुळे जागावाटपात भाजपा शिंदे गटाचं खच्चीकरण करणार, शिंदेंच्या शिवसेनेची एक आकडी जागांवर बोळवण केली जाणार, काही खासदारांना भाजपाच्या चिन्हावर लढवले जाणार आदी एक ना अनेक प्रश्नांचा निकाल लागला. त्यामुळे महायुतीमधील जागावाटपाच्या तहामध्ये एकनाथ शिंदे जिंकले, असं आता राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

खरं तर शिवसेनेत झालेल्या बंडाचं नेतृत्व करून एकनाथ शिंदे हे सुमारे ४० आमदारांना घेऊन महायुतीमध्ये आले, तेव्हा अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मित्रपक्षांना एखादं जास्तीचं मंत्रिपदही न सोडणारा भाजपा शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपद देतो ही बाब तेव्हा आश्चर्यकारक वाटली होती. मात्र या बंडाला वर्ष होता होता अजित पवारही आपल्या अनेक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट सोबत घेऊन महायुतीत डेरेदाखल झाले होते. दोन तुल्यबळ पक्ष असताना महायुतीत तिसरा पक्ष आल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण होईल, अशी शक्यता तेव्हापासूनच निर्माण झालेली होती. प्रत्यक्ष जागावाटपावेळी घडलेही तसेच. अबकी बार ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५+ जागा जिंकण्याचं लक्ष्य समोर ठेवलेल्या भाजपाने महायुतीमधील जागावाटपाच्या चर्चेत ताठर भूमिका घेण्यास सुरुवात केली होती.

भाजपा महाराष्ट्रात ३२ ते ३६ जागा लढवेल, अशी चर्चा होती. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ९ ते १२ जागांवर बोळवण होणार, असा दावा केला जात होता. शिंदे गटातील विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाणार, काहींना कमळ चिन्हावर लढवणार, या चर्चांमुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. शिंदे गटातील काही नेत्यांनी या अस्वस्थतेला मोकळी वाटही करून दिली. मात्र शिंदे गटाचे मुख्य नेते असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या काळात फारच संयमी भूमिका घेतल्याचे दिसले. त्यांनी महायुतीमधील मित्रपक्ष नाराज होतील, असं कुठलंही विधान उघडपणे केलं नाही. उलट महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहेत त्या सर्व जागा मिळतील, असे सातत्याने सांगितले. सुरुवातीचे बरेच दिवस एकनाथ शिंदे यांनी जागावाटपात किती जागा मिळतील, हा आकडा कधीही स्पष्टपणे सांगितला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमधून त्यांनी आपला पक्ष १६ जागा लढवेल, असे स्पष्टपणे सांगितले. मात्र शिंदे गटाला कुठल्या जागा मिळतील, याबाबतचा तिढा कायम होता. त्यात विशेष करून नाशिक आणि ठाणे हे मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा आग्रही होता. मात्र ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तो मतदारसंघ भाजपाला सोडणं शिंदेंसाठी नामुष्की ठरली असती. तर नाशिकमध्ये शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा आधीच करून ठेवली होती. त्यामुळे तिथेही माघार घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघांमध्ये शेवटपर्यंत चर्चा आणि वाटाघाटींची भूमिका घेतली आणि हे मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणले. त्यामुळे पालघरचा अपवाद वगळता सोबत असलेल्या १३ खासदारांपैकी १२ मतदारसंघ शिंदेगटाला मिळाले. सोबत ठाणे, दक्षिण मुंबई, छत्रपती संभाजीनगर हे आणखी तीन मतदारसंघही शिंदेंनी मिळवले. महायुतीमधील जागावाटपाचं सध्याचं चित्र पाहता शिंदे फायद्याात राहिले.

भाजपाने नेमकं काय कमावलं?

आता जागावाटपामध्ये भाजपाने सुरुवातीच्या ताठर भूमिकेनंतर औदार्य दाखवत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एवढ्या जागा कशा काय सोडल्या, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. आता भाजपाच्या या औदार्यामागेही काही कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण म्हणजे भाजपाने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे भाजपा हा मित्रपक्षांचं खच्चीकरण करतो, आता शिंदे गटाला ही भाजपा असाच गिळंकृत करणार, लोकसभेच्या मोजक्या जागा देऊन गुंडाळणार, असं चित्र उभं  करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून नेटाने सुरू होता. तसेच महायुतीमधील जागावाटपाबाबत येत असलेल्या बातम्यांमधून वरील दावा खरा असल्याचे भासत होते. त्यामुळे हा दावा खोडून काढण्यासाठी शिंदे गटाला सन्मानजनक जागा देणे भाजपाला भाग होते. त्या कारणानेच भाजपाने नाशिक, ठाणे यांसारख्या जागांवर प्रतिष्ठेचा विषय केल्यानंतरही आपली दावेदारी सोडली असावी, याकडे जाणकार लक्ष वेधतात. 

दुसरी बाब म्हणजे, महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यातील मतदान कमी झाल्याने ही बाब महायुती विशेषकरून भाजपाच्या विरोधात जाईल असे बोलले जात आहे. त्यात पुढच्या टप्प्यात ज्या भागात मतदान होणार आहे तिथे शिवसेनेची ताकद बऱ्यापैकी आहे. आता जागावाटपात शिंदे गटाला कमी जागा दिल्या असत्या तर शिवसैनिकांमध्ये चुकीचा संदेश गेला असता, तसेच शिंदे गटाला डावलून तिथे भाजपाने आपले उमेदवार दिले असते तर त्या ठिकाणी शिवसैनिकांकडून भाजपा ऐवजी ठाकरे गटाच्या उमेदवारांना मत दिले जाण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत आव्हान आधीच वाढलेले असताना आणखी नुकसान नको म्हणून भाजपाकडून मवाळ भूमिका घेतली गेली, असा मुद्दा राजकीय विश्लेषकांनी मांडला आहे. 

बाकी काही असले तरी, सद्यस्थितीत एकनाथ शिंदे यांनी जागावाटपाच्या वाटाघाटीमध्ये बाजी मारलीय. आता शिवसेना शिंदे गटाला मिळालेल्या जागांचा आढावा घेतला तर अनेक मतदारसंघात शिंदे गटाची गाठ ही ठाकरे गटाशी पडणार आहे. मतदानाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये शिवसेनेची ताकद असलेल्या महामुंबई परिसरात पाच मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार आमनेसामने येणार आहेत. त्याशिवाय नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मावळ, हातकणंगले येथेही ठाकरे आणि शिंदे गटात लढती होतील. त्यामुळे मतदारांच्या नजरेत खरी शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तरही या मतदानातून मिळणार आहे. त्यामुळे जागावाटपात बाजी मारल्यानंतर आता त्यामधील अधिकाधिक जागा जिंकण्याचं आव्हान एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेसमोर असेल.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Eknath Shinde won the seat-sharing negotiations, taking the constituencies it wanted; What exactly did BJP achieve?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.