Join us  

टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मधील सगळेच कार्यक्रम स्टार प्रवाहाचे, ही मालिका ठरली अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 3:25 PM

काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील कार्यक्रम हे टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मध्ये असायचे.

ठळक मुद्देदुसऱ्या क्रमांकावर मुलगी झाली हो ही मालिका आहे. मुलगी झाली हो या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

काही महिन्यांपूर्वी झी मराठीवरील कार्यक्रम हे टिआरपी रेसमध्ये पहिल्या पाच मध्ये असायचे. माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, अग्गंबाई सासूबाई, माझा होशील का, चला हवा येऊ दे यांसारख्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. कलर्स मराठी अथवा स्टार प्रवाहवरील मालिका पहिल्या पाचमध्ये कधीच नसायच्या. पण आता सगळ्या मालिकांना मागे टाकत स्टार प्रवाहवरील मालिका अधिक फेमस झाल्या आहेत. कारण या आठवड्याच्या टिआरपीनुसार पहिल्या पाचमध्ये असलेल्या सगळ्याच मालिका या स्टार प्रवाह वाहिनीवरील आहेत.

बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडिया) च्या रिपोर्टनुसार, स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका टिआरपी रेसमध्ये अव्वल ठरली आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. जयदीप-गौरीसोबतच मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करत आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर  मुलगी झाली हो ही मालिका आहे. मुलगी झाली हो या मालिकेची कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत एका महिलेने सगळ्यांचा विरोध पत्करून मुलीला जन्म दिला आहे इतकंच नाही तर एकटीने तिची संपूर्ण जबाबदारीही स्वीकारली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आहे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलीचं शिक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं वर्चस्व जरी पाहायला मिळत असलं तरी लग्नानंतर तिने घरी धुणी भांडी करावीत, घरसंसारात स्वत:ला झोकून द्यावं अशी अपेक्षा सासरच्या मंडळींकडून केली जाते. मात्र एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देणं म्हणजेच खरा संसार असतो. एकमेकांत मिसळून फुलण्यालाच संसार म्हणायचा असतो. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेची गोष्ट अशाच स्वप्नांना पूर्ण करणाऱ्या संसाराची आहे.

चौथ्या क्रमांकावर रंग माझा वेगळा ही मालिका असून या मालिकेने सर्वांचंच लक्ष वेधलं. रंगावरून, वर्णावरून मान अपमानाच्या अनेक गोष्टी आपण ऐकतो. याच विषयावर आधारित ही मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे मुख्य भूमिकेत आहे.

पाचव्या क्रमांकावर सहकुटुंब सहपरिवार ही मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांसोबतच या मालिकेची कथा देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.  

टॅग्स :स्टार प्रवाह