In the world of women who say I am my favorite | मैं अपनी फेविरट हूं म्हणणाऱ्या महिलांच्या जगात 

मैं अपनी फेविरट हूं म्हणणाऱ्या महिलांच्या जगात 

-शुभा प्रभू- साटम

आपल्याकडे बायकांनी, त्यातही मोठ्या वयाच्या बायकांनी कसं वागावं याचे ठाम सामाजिक संकेत असतात.

त्यांचं बोलणं, कपडे, मतं सगळ्यावर समाजाचा अदृश्य अंकुश असतो. म्हणजे चार भिंतीत बायका बायकांमध्ये करा दंगा; पण बाहेर नको आणि सोशल मीडियावर तर बिलकुल नको. सोशल मीडियावर तरुण मुलींना गलिच्छ ट्रोल करतात, तर स्रियांचं काय होत असेल ?

हेच मी अहमदाबादच्या डॉक्टर फाल्गुनी वसावडाला विचारला. आधी तर ती मनसोक्त हसली आणि म्हणाली, ‘खरं तर मी अशा ट्रोल ना सरळ ब्लॉक करते, उत्तरबित्तर नाही सरळ ब्लॉक किंवा तक्रार, माझी ब्लॉक लिस्ट तर कॉन्टॅक्ट लिस्टपेक्षा जास्त मोठी आहे’

फाल्गुनी इन्स्टाग्रामवर रोल्समध्ये छोटे छोटे व्हिडिओ टाकते आणि मिम्सपण ठाम शब्दात टाकते. लिंग निरपेक्षता, आर्थिक स्वातंत्र्य याबद्दल जबरदस्त संदेश देते, मनमोकळी शैली आणि उत्फुल्ल हास्य, मस्त साड्या, साजेशी ज्वेलरी, वेगवेगळ्या लिपस्टिक, यामुळे फाल्गुनी बघता बघता लोकप्रिय झाली आहे. मार्केटिंगमध्ये पीएच.डी. केलेली फाल्गुनी ॲडव्हर्टायझिंग, ब्रॅण्ड मॅनेजमेण्ट शिकवते. ऑर्कुट आले तिथपासून सोशल मीडियावर आहे. या लॉकडाऊनमध्ये तिचे व्हिडिओ जबरदस्त लोकप्रिय झाले. इतके की या विषयावर व्हिडिओ करा, इथ ते मला अमुक अमुक प्रॉब्लेम आहे इथपर्यंत लोकं तिला सांगत- विचारत असतात.

फाल्गुनी मस्त एन्जॉय करत रोज नवे नवे व्हिडिओ टाकते. कधी विनोदी, कधी सामाजिक भाष्य करणारे, अतिशय मुक्त असा तिचा वावर असतो.

तशीच गोव्याची मंजिरी वर्दे. ती सांगते, ‘फॉलोअर्स खूश असतात; पण काही विघ्नसंतोषी वाईट टीकापण करतात, अर्थात माझा मूळ स्वभाव अतिशय स्वतंत्र आणि निर्भीड असल्यानं मी त्यांना काही भाव देत नाही.’ मंजिरी प्रसिद्ध प्रथितयश चित्रकार आहे. लॉकडाऊनमध्ये ती आणि तिची सून समीरा रेड्डी घरातच अडकल्या.

एकतर घर मोठे, परत दोन लहान मुलं आणि कामाला मदत नाही. पण त्यातही या सासू-सुनेच्या जोडगोळीनं विरंगुळा शोधला, मॅसी ममा आणि सासी सासूमा म्हणून त्यांचं इन्स्टाग्राम अकाउण्ट आहे. दोघी तुफान धमाल करत असतात, कधी रेसिपी, कधी गप्पा, गॉसिप. मंजिरी आपल्या बोहो स्टाइलच्या कपड्यानं सासूच्या पारंपरिक प्रतिमेला मस्त छेद देते. प्रत्येकाला त्याची स्पेस, अवकाश हा द्यायलाच हवा हे मंजिरीचं ठाम मत आहे. मंजिरी चित्रकार आहेच आणि हवीहवीशी वाटणारी, धमाल करणारी, मिश्कील अशी सासूपण!

नंदिता श्रीवास्तव या दोघींपेक्षा वयानं लहान, कुकर, चणेवाल्या प्रसिद्ध कोकिलाबेनसारखी हुबेहूब वेशभूषा करून, नंदिता मजेदार व्हिडिओ करते. तिचेही मोठे फॅन फॉलोविंग आहे.

लवनीत कौर म्हणून आहे ती रेसिपी, विनोदी व्हिडिओ, आयुष्याचे धडे, व्यावहारिक सल्ले असे पेश करते. महत्त्वाचं म्हणजे यात तिची सासूसुद्धा मस्त तयार बिअर घेऊन त्यात सहभागी होते. दोघी मिळून मस्त एन्जॉय करत असतात. त्यांचेपण खूप फॅन्स आहेत.

या सगळ्याजणी हे एक उदाहरण झालं. पण वय हा मुद्दा बाजूला ठेवून त्यांनी सोशल मीडियातून आपल्या आयुष्यात रंग भरले आहेत. तसं पाहता टिपिकल व्याख्यांच्या अर्थानं या सगळ्याजणी देखण्या, कमनीय, बिलकुल नाहीत. पण फाल्गुनीच्या म्हणण्याप्रमाणे ‘बॉडी कॉन्शिअस’ असण्यापेक्षा ‘बॉडी कॉन्फिडन्ट’ व्हा! आणि हेच या सगळ्याजणी प्रत्यक्षात आणून दाखवतात. वय, शरीरयष्टी, दिसणं याचा विचार न करता उत्फुल्ल जगतात. मुक्त ! आनंदी !

हे असं भरभरून जगणं ही तर जगण्याची खऱ्या अर्थानं दिवाळी आहे.

(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या आहेत.)

shubhaprabhusatam@gmail.com

Web Title: In the world of women who say I am my favorite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.