A woman can do farming well .. This is an example! | बाई उत्तम रितीनं शेती करू शकते.. हे आहे एक उदाहरण!
बाई उत्तम रितीनं शेती करू शकते.. हे आहे एक उदाहरण!

-मंजूषा पेठे-मेहरा

भारतात महिला शेतकरी असणं हे मी कधी ऐकलेलं नव्हतं. म्हणूनच माङया आई-वडिलांकडून मी जेव्हा शेती करणा-या स्वाती सोनारचं कौतुक ऐकलं तेव्हा काहीही करून तिला भेटायचंच असं मी
ठरवलं. स्वातीला प्रत्यक्ष भेटल्यावर आईबाबा तिचे जे कौतुक करत होते ते किती खरं आहे हे मला जाणवलं. स्वातीच्या मुलीनं कॉलेज शिक्षणासाठी घर सोडलं आणि स्वातीला घरात एकाकी वाटायला लागलं. या रिकाम्या वेळेचा उपयोग कसा करावा हा विचार करतानाच आपल्या घरची शेती आहे तर शेतावरच्या कामातच थोडं लक्ष द्यायला काय हरकत आहे हा विचार तिला स्वस्थ बसू देईना. संदीपला म्हणजे तिच्या नव-याला तिनं ‘शेती करण्याचा’ विचार सांगितला तेव्हा त्यांनीही तिच्या या इच्छेला पसंती दर्शवली.
स्वातीला तिच्या आजोळपासूनच शेतीचं बाळकडू मिळालेलं होतं. पण शेती करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही हे तिला माहीत होतं. तरीही एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असा विचार तिनं केला आणि ती कामाला लागली. शेती करून खूप मोठा आर्थिक फायदा मिळवावा हा तिचा हेतूच नव्हता. उलट आपली शेती पर्यावरणाला पूरक कशी होईल हा विचार त्यामागे होता. विशेष म्हणजे रासायनिक खतं न वापरता शेतातच नैसर्गिक पद्धतीनं तयार होणा-या खतांचाच उपयोग करायचा यावर तिचा कटाक्ष होता. हे दोन मुख्य उद्देश डोळ्यापुढे ठेवूनच ती शेतीच्या कामाला भिडली.
प्रत्यक्ष शेती करण्यापूर्वी शेती करण्याचं ज्ञान असायला हवं म्हणून तिनं नाशिक आणि आसपासच्या नावाजलेल्या मोठय़ा शेतक -यां च्या भेटी घेतल्या. त्यांच्याबरोबर चर्चा केल्या. त्यातूनच सुभाष पाळेकर या प्रसिद्ध शेतक -यांशी तिची ओळख झाली. पर्यावरणपूरक आणि कृत्रिम खतांचा वापर न करता नैसर्गिक खतं वापरूनच शेती करण्याची त्यांची पद्धत स्वातीला एकदम पसंत पडली. तिनं त्यांच्या   विविध चर्चासत्रंना हजेरी लावली आणि शेतीची ब -यापैकी माहिती मिळवली. 
आपल्याला शेतीचं पुरेसं ज्ञान मिळालं आहे असं वाटल्यानंतरच स्वातीनं शेती कसायला घेतली. पाळेकरांच्या सांगण्यावरूनच स्वातीनं आपल्या शेतात ऊस लावायचं ठरवलं. कारण उसाचं पीक काढायला फार मेहनत लागत नाही. ते सर्वस्वी पावसावर अवलंबून नसतं तरीही आर्थिकदृष्टय़ा ते फायदेशीरच ठरतं. सुभाष पाळेकरांच्या सूचनेप्रमाणोच, ‘मल्टि क्रॉपिंग सिस्टीमचा’ तिनं उपयोग केला. उसाच्या दोन रांगांच्या मधल्या भागात थोडय़ा थोडक्या नव्हे तर गहू, हरभरा, ज्वारी, उडीद, तूर, ओवा, अळशी, मूग, चवळीसारखी कडधान्यं आणि काही भाज्या, एवढी पिकं  घेतली. बहुविध पीक पद्धतीमुळे  जमिनीचा कस कमी न होता उलट वाढतोच याचाही अनुभव तिला आला.
कधी कधी पिकांवर अळ्या, किडे पडतात, कधी बुरशी येते. पण पक्षी किडीवर तुटून पडतात आणि पिकांना राखतात हे तिनं स्वत: पाहिलं. पक्ष्यांमुळे शेतीचं नुकसान न होता उलट फायदाच झाल्याचा तिला अनुभव आला. स्वाती  खत म्हणून स्वत:च ‘जीवामृत’ तयार करते. देशी गाईचं शेण, मूत्र, गूळ आणि बेसन हे एकत्र करून ती जीवामृत बनवते. हे नैसर्गिक खत वापरल्यामुळे जमिनीतील जिवाणू आणि गांडुळं वाढण्यास चांगलीच मदत झाली. ताक आणि दशपर्णी अर्क यांसारख्या नैसर्गिक गोष्टी वापरून तिनं कीड नियंत्रण केलं. नैसर्गिक शेतीचा प्रयोग राबवून केलेल्या शेतीतून स्वातीला पहिल्या वर्षीच चांगलं यश मिळालं.   शेतातल्या उसावर जवळ जवळ दहा ते साडेदहा टन गूळ तयार झाला. स्वातीनं शेतीला सुरुवात करायची ठरवल्यावर आजूबाजूच्या शेतक -यां नी तिच्याकडे साशंकतेनं पाहायला सुरुवात केली. ‘एका बाईला हे कसं काय ङोपणार? तिचा निभाव लागणार का? रासायनिक खते वापरल्याशिवाय तिचं काम कसं काय भागणार?’ या आणि अशा नकारात्मक प्रश्नांचा तिला सामना करावा लागला. पण तिनं या नकारात्मक प्रश्नांकडे, शंकांकडे फारसं लक्षच दिलं नाही. आणि त्यांच्या मदतीची आणि पाठिंब्याची अपेक्षाही केली नाही. पण दुस -या वर्षी स्वातीच्या मेहेनतीला आलेलं घवघवीत यश पाहून  बाईला शेती उत्तम जमते याची त्यांना खात्री तर पटलीच शिवाय त्यांनी स्वातीला सहकार्याचा हातही दिला. स्वातीच्या शेतावर उत्कृष्ट दर्जाच्या गुळाच्या ढेपी, बारीक गूळ आणि काकवी (लिक्विड गूळ) अशा तीन प्रकारात गूळ तयार होतो. आपल्या उद्योगाची तिनं कुठेही फार जाहिरात केली नाही. फक्त महिला मंडळ, किटी पार्टीज किंवा महिलांची भिशी या माध्यमातून तिनं महिलांना आपल्या प्रयोगाबद्दल सांगितलं. महिलांनी तिला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला. 
स्वातीच्या या यशामुळे महाराष्ट्रातील एका उसासंबंधित परिषदेचं तिला निमंत्रण मिळालं.  तिथे जमलेल्या सभासदांना आपले अनुभव सांगून उपस्थितांकडून तिने कौतुकाची पावती मिळविली. बघता बघता दोन वर्षातच तिनं तिचा उद्योग दुप्पट वेगानं वाढवला. सकारात्मक दृष्टिकोन, प्रबळ इच्छा आणि सतत परिश्रम घेण्याची तयारी यामुळे स्वातीसारखी एक महिला शेतकाम आणि त्यावर जोड उद्योग करण्यात यशस्वी तर झालीच; शिवाय  पर्यावरणाचा समतोल राखून, नैसर्गिकरीतीनं केलेली उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं आपण समाजाला देऊ शकू हा विश्वास तिनं मिळवला. 
आता याच विश्वासाच्या बळावर ती इतरांच्या इच्छाशक्तीला बळ देत आहे.

(लेखिका अमेरिकेत रिहॅबिलिटेशन  कंपनीच्या संचालिका आहेत.)

Web Title:  A woman can do farming well .. This is an example!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.