Will the rush of coding overwhelm the kids? | कोडिंगची घाई मुलांना झेपेल ?

कोडिंगची घाई मुलांना झेपेल ?

-डॉ. एस. एस. मंथा  

कोरोनाच्या काळात देशातली संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना काही भारतीय एज्युटेक कंपन्यांनी मात्र नवीन वळण घेतलं आहे. आपल्याकडे ४५०० एज्युटेक कंपन्या आहेत. त्यात बायजू, डॉऊटनट, ग्रेडअप, टेस्ट बुक, टॉपर, अनअकॅडमी, वेदांतू यासारख्या कंपन्यांच्या व्यवसायात सध्या वृद्धीची लाट आली आहे. सध्याच्या परिस्थितीत व्हाइट हॅट या ऑनलाइन कोडिंग शिकवणाऱ्या कंपनीनं व्यक्तिकेंद्री सेवा पुरवत एज्युटेक कंपन्यांच्या विश्वात विशेष प्रभाव टाकला आहे. आता तर बायजूसारखी एज्युटेक कंपनीही ही सेवा देत आहे. सध्या या ऑनलाइन कोडिंग क्लासेसच्या जाहिराती मुलं आणि पालकांवर प्रभाव टाकत अवाजवी आणि अवास्तव अपेक्षा निर्माण करत आहेत.

व्हाइट हॅट ज्युनिअरसारख्या ऑनलाइन कोडिंग शिकवणाऱ्या व्यासपीठाची लोकप्रियता दिवसागणिक दुपटीनं का वाढत आहे, याचा विचार केलाय का? गेल्या वर्षभरात सात लाख मुलांनी कोडिंग शिकण्यासाठी साइन अप केलं आहे. त्यामागचं काय कारण असावं?

 

अनेक पालकांची तक्रार असते, की प्रयोगानुकूल शाळांची मुळातच कमतरता आहे. त्यातही शाळेत मुलांना फक्त लक्षात ठेवायला शिकवलं जातं. त्यामुळे नवीन काही करण्याचं मुलांना उमजत नाही आणि जे शिकवलं आहे त्यापलीकडे विचार करण्याची क्षमता पोहोचत नाही. त्यामुळे मेंदूची डावी बाजू जी तर्कसंगत विचार करते आणि उजवी बाजू जी सृजनात्मकतेला जबाबदार असते तिचा योग्य विकास होत नाही. जर मुलांनी घरातल्या घरात बसून ऑनलाइन कोडिंग शिकायला सुरुवात केली तर काय होईल?

व्हाइट हॅटसारख्याऑनलाइन कोडिंग शिकवणाऱ्या ऑनलाइन संस्था कोडिंगद्वारे तर्कसुसंगतता आणि सृजनात्मकतेला वाव देण्याचा दावा करतात. म्हणजे एखादा फिल्म बनवू शकतो, आरोग्य सुदृढ करणारा फॅशन ट्रेण्ड कोणी शोधू शकतं, विज्ञान प्रकल्पात योगदान देणारे प्रकल्प, वेबसाइट डिझाइन, स्वत:चे व्हिडिओ गेम बनवणं, कॉम्प्युटरला गृहपाठ करायला शिकवणं, ॲप बनवणं, हवामानाचा अंदाज सांगणं, एखादं गाणं तयार करणं यासारख्या अनेक गोष्टी मुलं स्वत: करू शकतात, नव्यानं शोधू शकतात. विविध कल्पना कोणत्याही अडथळ्याविना कृतीच्या पातळीवर आणू शकतात ही ऑनलाइन कोडिंग शिक्षणाची प्रभावी बाजू, तर दुसऱ्या बाजूला सुरू असलेल्या जाहिराती. त्या काय सांगतात की आठ ते दहा वर्षांची मुलं कोडिंग शिकून, गेमिंग ॲप बनवून लक्षाधीश बनू शकतात.

पण आपल्या आठ-दहा वर्षांच्या मुलांनी हे करणं आपल्याला अपेक्षित आहे का? या प्रयोगाच्या दीर्घ परिणामांबद्दल कोणी काही विचार करतंय का? या वयात हे सर्व करून आपण आपल्या मुलांच्या बालपणाची काय किंमत मोजतो आहोत, याचा कोणी विचार केला आहे का?

कोरोनाकाळात कोडिंग शिकण्याचा ट्रेण्ड ही एक बाजारपेठीय चाल आहे. हा कोरोनाकाळ संपल्यानंतरही ही कोडिंग शिकण्याची क्रेझ राहील का, हा खरा प्रश्न आहे. मुलांसाठी आरोग्य, सुरक्षा, पोषण, स्वत:ची ओळख, शिक्षण, त्यांचं सामाजिकीकरण या गोष्टी महत्त्वाच्या असतात. जेव्हा जाहिराती नऊ किंवा बारा वर्षांची मुलं कोडिंग शिकून कोट्यवधी कमावतात, कमावू शकतात असं सांगतात, तेव्हा मुलांच्या या सर्वांगीण विकासाचा विचार केला जातो का?

मुळातच शाळेतील दप्तराच्या ओझ्यामुळे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी वाकून गेली आहेत. कोडिंगसारख्या शिक्षणामुळे मुलांच्या मनावरचं ओझंही वाढणार आहे. मोकळं खेळायला,

आपल्या समवयस्क मित्रांमध्ये मिसळायला त्यांच्या हातात वेळच उरणार नाही.

मुलांची वाढ होणं ही खूप सुंदर प्रक्रिया आहे. प्रत्येक तासागणिक, दिवसागणिक वाढताना मूल नवीन काहीतरी शिकत असतं, नवा अनुभव घेत असतं, ते त्यांना तसेच अनुभवू द्यावेत. चौकटी न घालता मुलांना त्यांच्या गतीनं शिकू द्यावं, त्यांच्यातल्या आवडीनिवडी फुलू द्याव्यात. त्यांना गणित, विज्ञान, संगणक या सर्व विषयांत आपला आनंद शोधू द्यावा. त्या आनंदाला वेसण घालण्याची घाई कशाला करायची?

 

Web Title: Will the rush of coding overwhelm the kids?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.